लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने सांगली जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास तत्वतः मान्यता दिली आहे. तालुक्यातील विविध ठिकाणाहुन आपापल्या भागात उपकेंद्र स्थापनेबाबत मागणी होत असली तरी ‘उपकेंद्रा’ऐवजी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती झाली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी आपली व्यक्त केले.
व्हिजन सांगली-७५ फोरमच्या वतीने नेमिनाथनगर येथील सांगली ट्रेडर्स सोसायटीच्या सभागृहात चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर होते. यावेळी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रा.टी. आर. सावंत, मिरज महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम. व्ही. पाटील, प्रा. श्रीधर शिंदे, राजमती कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मानसी गानू , कस्तुरबाई महाविद्यालयाचे डॉ. पी. एन. चौगुले, नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. शीतलकुमार पाटील, चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट आदी उपस्थित होते.
ताम्हणकर म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या शैक्षणिक संस्था सांगली, मिरज परिसरात आहेत. उपकेंद्र कोठेतरी आडवळणी भागात नेल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. सध्या ऑनलाइन शिक्षण मोठ्या प्रमाणावर आहे तसेच नेट-कनेक्टिव्हिटीसुद्धा महत्वाची आहे. उपकेंद्र हा राजकीय विषय नसून, शैक्षणिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे.
बापट म्हणाले, नवीन केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यापीठाचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. त्यासाठी सांगलीला स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात फोरमचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, सोलापूरला सांगलीपेक्षा कमी महाविद्यालये असताना स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकते, तर सांगली जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्येच्या आणि शहराच्या विद्यापीठांशी संबधित जवळ जवळ ७५ टक्के विद्यार्थी हे सांगली शहर व् आसपासच्या परिसरात शिकतात. स्वतंत्र विद्यापीठासाठी प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर संघटना यांची मते विचारत घेऊन लवकरच रितसर प्रस्ताव पालकमंत्री जयंत पाटील व शिक्षणमंत्री उदय सामंत यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी फोरमचे वसंत पाटील, मोहन चौगुले, उपस्थित होते. स्वागत प्राचार्य शीतलकुमार पाटील यांनी व आभार फोरमचे सचिव राजगोंड पाटील यांनी मानले.