सांगली अर्बन बँकेला १५ कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:49+5:302021-04-13T04:25:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली अर्बन बँकेने कोरोना कालावधीच्या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली अर्बन बँकेने कोरोना कालावधीच्या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी दिली.
गाडगीळ म्हणाले, ३५ शाखांद्वारे १८२५ कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. भागभांडवल ३६.०४ कोटी इतके असून स्वनिधी १४६ कोटी आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषांप्रमाणे भांडवल पर्याप्तता प्रमाण ९ टक्के इतके असणे आवश्यक असताना हे प्रमाण १२.५ टक्के इतके राखले आहे. ३१ मार्चअखेर ठेवी ११६९ कोटी इतक्या झाल्या असून ६५६ कोटींचे कर्जवाटप केले आहे. कर्जात वाढ झाली नसली तरी वसुली चांगली झाल्याने एनपीएचे प्रमाणात २ टक्क्यांनी घटले असून ते १७ टक्के इतके झाले आहे. नेट एनपीएचे प्रमाण ७ टक्के आहे.
बँकेची गुंतवणूक ५३७ कोटी आहे. यापैकी सुमारे ४०० कोटी गुंतवणूक सरकारी कर्जरोख्यात आहे. यातून सरकारी कर्जरोखे खरेदी-विक्री करून चांगला नफा झाला. खेळते भांडवल १३२१ कोटी आहे. जुलै २०१९ मध्ये आलेला महापूर तसेच या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ठेववाढीवर विपरीत परिणाम होऊनही चांगली प्रगती केली आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.