सांगलीला दररोज पुण्यातून मिळणार ४४ टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:36+5:302021-05-08T04:27:36+5:30
सांगली : जिल्ह्याची ऑक्सिजन कोंडी फोडण्यात शुक्रवारी प्रशासनाला यश आले. सांगलीसाठी पुण्यातून दररोज ४४ टन ऑक्सिजन मिळणार असून, टँकर ...
सांगली : जिल्ह्याची ऑक्सिजन कोंडी फोडण्यात शुक्रवारी प्रशासनाला यश आले. सांगलीसाठी पुण्यातून दररोज ४४ टन ऑक्सिजन मिळणार असून, टँकर यायला सुरुवात झाली आहे. यामुळे रुग्णांबरोबरच डॉक्टरांनाही दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी रात्रीपर्यंत २५ टन ऑक्सिजन जिल्ह्यात दाखल झाला. आणखी काही टँकर रात्री उशिरा पुण्यातून निघणार होते. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ४० टनांपर्यंत असताना ४४ टनांचे नियोजन प्रशासनाने केले; त्यामुळे टंचाईस्थिती तूर्त निवळली आहे. बेल्लारीहून होणारा पुरवठा अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली होती. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्राण कंठाशी आले असताना कर्नाटकने महाराष्ट्राची नाकेबंदी केली होती; पण पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रयत्न करून सांगलीसाठी ऑक्सिजन उपलब्ध केला. त्यानुसार आता पुण्यातील खासगी उद्योगांकडून पुरवठा होणार आहे.
दिल्लीतील ऑक्सिजनची आणीबाणी पाहून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले होते. त्यामुळे केंद्राने ऑक्सिजन वितरणाचे फेरनियोजन केले. त्याचाच भाग म्हणून बेल्लारीच्या जिंदाल स्टील प्रकल्पातून पश्चिम महाराष्ट्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना बसला. आता केंद्राच्या नियोजनानुसार सांगलीसाठी पुण्यातून ऑक्सिजन वाटप निश्चित झाले. त्याची कार्यवाही गुरुवारपासूनच सुरू झाली. बेल्लारीमधून ऐनवेळेस रद्द केलेल्या दहा टनांच्या एका टँकरच्या बदल्यात पुण्याहून पहिला टँकर आला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरात पुरवठा सुरळीत होऊ लागला. सकाळी १० टन व संध्याकाळी १५ टन ऑक्सिजन आला. रात्री उशिरा आणखी एक किंवा दोन टँकर निघणार होते. पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठा होणार आहे.
चौकट
वाईटातून चांगल्याची निष्पत्ती
बेल्लारीतून सांगलीला होणारा पुरवठा थांबल्याने सारेच हवालदिल झाले होते; पण आता पुण्यातून पुरवठा सुरू झाला आहे. आधी बेल्लारीसह पुण्यातून जेमतेम ३०-३५ टन ऑक्सिजन मिळायचा, आता पुण्याहून दररोज ४४ टन मिळणार आहे. जिल्ह्याच्या ४० टनांच्या मागणीपेक्षा तो जास्तच आहे. बेल्लारीहून टँकर यायला १२ तास लागायचे. पुण्याहून मात्र पाच-सहा तासांतच येणार आहे. शिवाय सांगलीच्या अधिकाऱ्यांना पुण्याशी संवाद साधणे सोपे जाणार आहे.
कोट
सांगलीसाठी पुण्यातून कोटा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. शुक्रवारी दिवसभरात दोन टँकरमधून २५ टन मिळाला. रात्री आणखी टँकर येतील.
- नितीन भांडारकर, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन