सांगली : भाजपमधील तिढा आज सुटणार?

By admin | Published: September 25, 2014 10:34 PM2014-09-25T22:34:49+5:302014-09-25T23:29:30+5:30

समितीची औपचारिकता : सांगलीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Sangli: Will the tide of BJP be released today? | सांगली : भाजपमधील तिढा आज सुटणार?

सांगली : भाजपमधील तिढा आज सुटणार?

Next

सांगली : भाजपच्या सांगलीतील उमेदवारीबाबत उत्सुकता ताणली गेली असली तरी, येथील नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. स्थानिक वादावर तात्पुरता पडदा पडावा म्हणून समिती नियुक्तीची औपचारिकता पार पाडण्यात आली आहे. उद्या (शुक्रवारी) उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सांगलीतील भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्न भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पडला होता. या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नेत्यांमध्ये उमेदवारीवरून वाद उफाळल्याने गुरुवारी यासंदर्भात समिती नियुक्तीची औपचारिकता पार पाडण्यात आली होती. राज्यस्तरावरील महायुतीच्या चर्चेत व्यस्त असलेल्या नेत्यांनी नाव निश्चित करण्यासाठी समितीची औपचारिकता पार पाडली. वास्तविक समिती नियुक्तीपूर्वीच उमेदवारी कोणाला द्यायची, हे निश्चित झाल्याचे समजते. महायुतीच्या निर्णयापूर्वी कुठेही वाद नकोत म्हणून वादाच्या जागांवरील नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. आता सांगलीचे नाव शुक्रवारी जाहीर होणार आहे.
सांगलीत सध्या विद्यमान आमदार संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, सुधीर गाडगीळ, नीता केळकर, शिवाजी डोंगरे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. संभाजी पवारांविरोधात पदाधिकारी व इच्छुकांचा मोठा गट आहे. त्यांनी राज्यस्तरावर सांगलीतील उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा बनविला आहे. पवारांना उमेदवारीच देऊ नये म्हणून या गटाने प्रयत्न चालविले आहेत. त्यांना खासदार संजय पाटील यांचे सहकार्य आहे. लोकसभा निवडणुकीत पवारांनी संजय पाटील यांचा प्रचार करण्यास नकार दर्शविला होता.
याबाबतचा अहवालही पक्षाकडे पाठविण्यात आला होता. पवारांनी पक्षाकडे खुलासाही केला आहे. मात्र सांगलीतील उमेदवारीचा वाद अजूनही सुरूच आहे. या आठवड्यात दोन्ही गटांनी उमेदवारीचा दावा करताना एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. वाद उफाळल्याने समिती नियुक्त करून उमेदवारीचा निर्णय घेण्यात येईल, असे बुधवारी सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)

पवार पिता-पुत्राचा अर्ज दाखल होणार
आ. संभाजी पवारांसह त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवारही उद्या (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी दिली. संभाजी पवारांनी पृथ्वीराज यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे. त्यामुळेच या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार, की त्यांना डावलून अन्य कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगलीत भाजपची कोणालाही उमेदवारी मिळाली तरी, पक्षांतर्गत संघर्ष उफाळणार आहे. अन्य कोणाला उमेदवारी मिळाली, तर पवार गट अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे पवारांना उमेदवारी मिळाली, तर पदाधिकाऱ्यांचा गट अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवाराला पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागेल.

Web Title: Sangli: Will the tide of BJP be released today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.