सांगली : तरूणांनी स्वयंरोजगार सुरू करावा : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:44 PM2018-09-12T15:44:06+5:302018-09-12T15:49:06+5:30
व्यवसायाभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन, तरूणांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
सांगली : परंपरागत आर्टस्, सायन्स,आणि कॉमर्स या महाविद्यालयीन शाखांच्या पलीकडे जावून आज व्यवसायाभिमुख शिक्षण व्यवहारात येत आहे. असे विविध व्यवसायाभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन, तरूणांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
कौशल्य सेतू योजनेंतर्गत यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विलिंग्डन महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि व फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, एम. आय. डी. सी. च्या प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताह्मणकर, कौशल्य सेतूचे सांगली जिल्हा प्रमुख संजय परमणे, प्रकल्प अधिकारी नीलेश भटनागर, श्रीकांत पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात देशाची लोकसंख्या वाढली. मात्र, त्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या वाढली नाही. मनुष्यबळाऐवजी संगणक तसेच अन्य यंत्रांकडून काम करून घेतले जात असल्याने भविष्यात नोकऱ्यांची संख्या मर्यादित राहील, असे स्पष्ट करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या परिस्थितीचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू केली.
या योजनेतून देशभरात पाच कोटी युवकांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. या योजनेतून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांचे 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेऊन तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. कोणताही व्यवसाय छोटा नसतो. सेवाविषयक व्यवसायांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज व्यक्त करून, आगामी काळात कौशल्य विकासाला प्रतिष्ठा व प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी विविध दाखल्यांसह यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्तिमध्ये, विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कौशल्य असते. त्या पार्श्वभूमिवर दहावी, बारावी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य सेतू योजना सुरू केली.
या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन, त्याला प्रशिक्षित करण्यात येते. त्यामुळे तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता समाज व गावाची गरज ओळखून नवनवीन व्यवसाय सुरू करावेत. नोकरी घेणाऱ्याऐवजी नोकरी देणारे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कौशल्य सेतू योजनेंतर्गत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. या अंतर्गत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 केंद्रांच्या माध्यमातून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 600 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी 14 यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. तसेच, यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्या प्रमुखांचा आणि समन्वयकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.