लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही बहुतांश नागरिक रस्त्यावरच होते. विशेषत: मारुती रोड, शिवाजी मंडईत नागरिकांची गर्दी दिसून येत होती. पोलिसांनी दिवसभरात ठिकठिकाणी नागरिकांनी अडवून चौकशी केली. कोणते ना कारण देत नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दुसऱ्या दिवशीही कायम होते.
कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्यादिवशी शहरात अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. दुसऱ्या दिवशीही तेच चित्र शहरात दिसत होते. संचारबंदीत अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले होते. तरीही नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर आले आहे. कोणते ना कोणते कारण सांगून नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यात महिला व तरुणींचा समावेश आहे. किराणा दुकान, बँका, फळ व भाजीपाला विक्रेत्यांकडे होत असलेली गर्दीमुळे कोरोनाचे नियम पायदळी तुटविले जात आहेत.
शहरातील मारुती चौक, हरभट रोड, कापडपेठ या रस्त्यावर नेहमीसारखीच गर्दी होत आहे. सकाळच्या वेळी शिवाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होती. तर सायंकाळी मारुती चौक गर्दी व वाहनांनी फुलला होता. दुपारच्या वेळी मात्र शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकात बॅरिकेड्स लावले असून बंदोबस्तही तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम हे स्वत: रस्त्यावर उतरून तपासणी करीत होते.
चौकट
पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांत बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणीही केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांना समज देऊन पुन्हा घरी पाठविले जात आहे. त्यातूनही अनेकांनी पळवाटा शोधल्या आहेत. भाजी आणायला चाललोय, मेडिकलमध्ये जातोय, पार्सल आणण्यासाठी जातोय, अशी कारणे नागरिकांकडून देण्यात येत होती.
चौकट
याठिकाणी होतेय गर्दी
छत्रपती शिवाजी मंडई, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोड, विश्रामबाग, शंभरफुटी रोड आदि रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय गल्लीबोळातही नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत.