सांगली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी ९ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पक्षबांधणीसंदर्भातील बैठक याठिकाणी घेणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आठ नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर प्रथमच ते सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कॉंग्रेस व अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी केली आहे. सकाळी १0 ते साडे अकरा या कालावधित सांगली-माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीवेळी महापालिकेतील कॉंग्रेसचे सहा आणि अन्य पक्षातील दोन असे आठ नगरसेवक राणे यांना भेटणार आहेत.
जत, इस्लामपूर याठिकाणच्या अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे राणेयांच्या दौऱ्याने येथील राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत ताकदीने नियोजन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांची चिंताही राणेंच्या दौऱ्याने वाढविली आहे.
राष्ट्रवादी व अन्य काही संघटनांचे कार्यकर्तेही त्यांच्या संपर्कात असल्यामुळे राणेंच्या नव्या पक्षाची जोरदार बांधणी सांगलीतच अधिक प्रमाणात सुरू असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारच्या कोल्हापूर येथील दौरा संपल्यानंतर रात्री ते सांगलीला येणार आहेत.
शनिवारी सकाळी ९ वाजता सांगलीच्या गणपती मंदिरात दर्शन घेऊन साडे नऊ वाजता दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दहा ते साडे अकरा या वेळेत सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तिथून ते कराडकडे रवाना होणार आहेत.
नारायण राणे सांगलीच्या फारसे संपर्कात नसले तरी त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या याठिकाणी मोठी आहे. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या सांगली दौऱ्यावेळी अन्य नेत्यांपेक्षा त्यांच्याभोवतीच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोतावळा दिसायचा. त्यामुळे सांगलीत पक्षवाढीसाठी त्यांचे समर्थक आता तयारीला लागले आहेत.