भाजीपाल्याला कवडीमोल दर
सांगली : परिसरातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे भाजीपाला कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे व्यवसायातील नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. घातलेला खर्चही निघेल की नाही, याची शंका आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
उघडी रोहित्रे धोकादायक
सांगली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या रोहित्रांचे दरवाजे गायब आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीतून होत आहे. त्यामुळे त्यापासून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. या रोहित्रांच्या पेट्यांचे दरवाजे महावितरण कंपनीने त्वरित बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सर्रासपणे वृक्षतोड
सांगली : वनविभागाच्यावतीने वृक्ष न तोडण्याबाबत जनजागृती होत नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रस्त्याकडील वृक्ष तोड मोठ्याप्रमाणात करताना दिसत आहे. याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फूल उत्पादकांना फटका
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील आष्टा, कवलापूर, कारंदवाडी येथील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारपेठेअभावी फुले जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.
सांगली आगाराला फटका
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे सांगली आगारातील बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात मोठे नुकसान सांगली आगाराला सोसावे लागत आहे. राज्य शासनाने नियम व अटींचे पालन करून बससेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
व्यावसायिकांवर उपासमार
सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दीड महिन्यापासून संचारबंदी घोषित केली. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे रद्द करावे लागले. त्यामुळे कमाईचे चार महिने हातचे गेल्याने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने या व्यावसायिकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे.
आर्थिक बजेट कोलमडले
सांगली : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात ग्रामीण भागात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. घरातील फोडणी महागल्याने आर्थिक बजेट कोलमडत आहे़. साेयाबीन तेलाचे भाव १५० रुपयांवर पाेहोचले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे पोलीस प्रशासन वारंवार आवाहन करूनही लोक गर्दी करीत आहेत. यामुळेच ग्रामीणसह शहरी भागात रुग्णसंख्या वाढतच आहे. अनेक लोक गुपचुप विवाह सोहळ्यासह छोट्या कार्यक्रमांसाठी गर्दी करीत आहेत. लोकांनी प्रशासनासाठी नव्हे, तर आपल्या हितासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.