गाव वाचविण्यासाठी सरपंचांनी कठोर निर्णय घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:29+5:302021-04-13T04:25:29+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुुरू झाली आहे. रुग्ण संख्याही वाढत असून, हे संकट मोठे आहे. आपण सर्वजण मिळून यावर मात करू. पण, आपत्ती नियंत्रणात सरपंच, दक्षता समित्यांनी जबाबदारी लक्षात घ्यावी, कायदेशीर अधिकार वापरावेत. गाव वाचविण्यासाठी प्रसंगी कठोर कारवाई करा, प्रशासन तुमच्यासोबत आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील सरपंच, ग्रामदक्षता समित्यांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तालुक्यांचे गटविकास अधिकारी यांच्याशी डॉ. चौधरी यांनी सोमवारी दुपारी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादात सहभाग घेतला. जिल्ह्यातून ६५० पदाधिकारी, अधिकारी या संवादात सहभागी होते. यावेळी काही सरपंचांना शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.
डॉ. चौधरी म्हणाले, गावातील प्रत्येक घटकाला वाचविण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी दुकानाबाहेर रिंगण आखा. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. रुग्ण संख्या ज्या भागात अधिक आहे, तेथे औषध फवारणी करा. होम आयसोलेशन रुग्ण व नातेवाईक बाहेर फिरणार नाहीत, याची खबरदारी घ्या. घरावर तसा बोर्ड लावा. संबंधित रुग्णांच्या हातावर शिक्केही मारा.
जितेंद्र डुडी म्हणाले, गावासाठी वेळ द्या. सामाजिक कार्यकर्ते एकत्र करा. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आपणास मिळेल, तशा सूचना दिल्या आहेत.
चौकट
लक्षणे असतील, तर तपासणी करा
काही सरपंचांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावे का, अशी शंका विचारली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तशी काही गरज नाही. कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर त्यांची तपासणी करून घ्या. चाचणी पॉझिटिव्ह आली, तरच त्यांना क्वारंटाईन करून उपचार करण्याची गरज आहे.
चौकट
गावांनी शंभर टक्के लसीकरण करावे
जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १० हजार रुग्णांना लस दिली गेली आहे. लसीकरण वाढवा. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मंडप घाला, खुर्च्या आणा, पिण्याच्या पाण्याची सोय करा. ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेईल, याकडे सरपंचांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले.