आष्टा नगरीचे शिल्पकार विलासराव शिंदे म्हणजे वादळी व्यक्तिमत्त्व होते. या झंझावाताने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार यासह सर्वच क्षेत्रात नेतृत्वगुणाची छाप पाडली होती. आष्टा नगरीच्या हृदयसिंहासनावरील जाणता राजाच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
काकासाहेब ऊर्फ भाऊसाहेब शिंदे हे आष्ट्याचे थेट नगराध्यक्ष होते. त्यांचा जनसामान्यांवर पगडा होता. तोच वारसा विलासराव शिंदे यांना मिळाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी कामेरी येथे झाले. माध्यमिक शिक्षण इस्लामपूरला, तर नववी, दहावी आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयात झाली. १९५६ मध्ये कृषी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला. याचवेळी सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन सातारा व सांगली हे दोन वेगळे जिल्हे अस्तित्वात आले होते. राजकारण, समाजकारण याची आवड असलेल्या विलासराव शिंदे यांनी एस. पी. कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, वाडीया कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी जवळीक वाढवित सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे संयुक्त सातारा विद्यार्थी मंडळ स्थापन केले. त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
नेतृत्व, कुशलता आणि समाजकार्याचा पिंड विलासरावांच्या अंगी असल्याने इतरांच्या आनंदात आपला आनंद त्यांनी मानला. शेतकरी कॉलेजच्या निवडणुकीत विलासराव शिंदे यांच्यातील संघटनकौशल्य दिसून आले. त्यांच्या प्रयत्नामुळे सांगली, साताऱ्याची मुले पाठीशी राहिल्याने, मित्र निवडून आला. विलासराव शिंदे यांची जिद्द, चिकाटी व नेतृत्वगुण दिसून आले. साहेबांचा ओढा राजकारणाकडे असल्याने ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झाले.
लोकनेते राजारामबापूंनी १९६२ च्या विधानसभा निवडणुकीची या परिसराची जबाबदारी शिंदे साहेबांवर दिली. त्यांनी अहोरात्र प्रचार करून बापूंना निवडून आणले. बापूंनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. बावची जिल्हा परिषद मतदारसंघातून विलासराव शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. शेकापचे वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघात ते विजयी झाले. १९६२ ते ६७ या काळात जिल्हा परिषदेचा अभ्यासू सदस्य म्हणून त्यांनी ठसा उमटविला.
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास त्यांनी प्राप्त केला. १९६७ ला ते पुन्हा बावची मतदारसंघातून निवडून आले. केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन शिक्षण व अर्थ समितीचा कारभार त्यांच्यावर सोपविला. पुढे १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव शिंदे विजयी झाले, मात्र निवडणुकीनंतर राजकीय नाट्य रंगले. आणीबाणीच्या काळात वसंतरावदादा पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. दादांनी राजकारणातील मतभिन्नतेमुळे राजकीय संन्यास घेतला. यावेळी त्यांच्यामधील नेतृत्वगुण उजळून निघाले. राज्यातील काँग्रेस एकसंध होती. सर्व कार्यकर्ते एकसंध होते. दादा कोणाचेच ऐकत नव्हते. अशावेळी शिंदे साहेबांनी वसंतदादांना पुन्हा परत राजकारणात आणण्यासाठी शिवाजीराव देशमुख, संपतरावनाना माने, आप्पासाहेब बिरनाळे या सर्वांना बरोबर घेऊन राज्यात, जिल्ह्यात दौरे काढले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, दादांनी निवृत्ती न घेता समाजाचे काम करावे, असे ठराव संमत केले. पुढे विलासराव शिंदे व मंत्री जयंत पाटील एकत्र आल्याने वाळवा तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. विलासराव शिंदे जिल्हा बँकेचे पुन्हा अध्यक्ष झाले. विधान परिषदेचे आमदार झाले. जिल्हा राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्षाचे अखेरपर्यंत ते सांगली जिल्हाध्यक्ष होते.
आष्टा शहरात घरकुले, पाणीपुरवठा योजना, भाजी मार्केट, फिश मार्केट, बहुद्देशीय हॉल यासह कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. विलासराव शिंदे व जयंत पाटील यांच्या मनोमीलनामुळे अनेक पिढ्यांचा संघर्ष थांबला. आष्टा पालिका २००६ मध्ये बिनविरोध झाली. तेव्हापासून दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवित आहेत. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखविला.
आष्टा पालिकेत विलासराव शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून विकासकामे केल्याने शहराचा सर्वांगीण विकास झाला. विलासराव शिंदे नावाच्या झंझावातासमोर अनेकांनी तलवारी म्यान केल्या. त्यांनी आष्टा शहरात केलेली विकासकामे ही स्मृतिस्थळे ठरत आहेत.
शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन सर्वांना बरोबरीने न्याय देणाऱ्या या लोकनेत्यास विनम्र अभिवादन!