सांगली : रमजान महिन्यात मुस्लिम धर्मियांना मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने केली आहे. जिल्हाध्यक्ष बादशाह पाथरवट यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रमजान महिन्यात जादा नमाज अदा केले जातात. मुस्लिम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना व सण आहे. १४ एप्रिलपासून रमजानचे रोजे सुरु होत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मशिदीत नमाज अदा करता आली नव्हती. यावर्षीही रुग्णसंख्या वाढत असली, तरी कोरोनाची काळजी घेऊनच सामूहिक नमाज अदा केली जाईल. त्यामुळे प्रशासनाने तशी परवानगी द्यावी.
सणासुदीच्या दिवसात लोकांना चार पैसे मिळावेत, यासाठी छोटे व्यापारी व जीवनावश्यक साहित्याच्या विक्रीसाठीही परवानगी द्यावी. लॉकडाऊन करणारच असाल तर सर्व नागरिकांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, त्याशिवाय तांदूळ, गहू, साखर, तेल आदी जीवनावश्यक साहित्याचा रेशनद्वारे पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.