अविनाश कोळी
सांगली : तरुण भारत व्यायाम मंडळाचे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू व जलतरणपटू रघुनाथ दामोदर शिंदे (वय ७०) यांचा सोमवारी १५ ऑगस्टला नदीत पोहताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शिंदे गेली पन्नास वर्षे अखंडितपणे कृष्णा नदीपात्रात पोहत होते. पूरकाळातही त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.शिंदे हे तरुण भारत व्यायाम मंडळाचे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू होते. कबड्डीबरोबरच त्यांना जलतरणाची आवड होती. गेली पन्नास वर्षे अखंडितपणे कृष्णा नदीपात्रात ते पोहत होते. पूरकाळातही त्यांनी कधीही पोहण्यात खंड पडू दिला नाही. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते नदीत पोहायला गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या क्लबचे काही खेळाडूही होते. सांगलीतून हरीपूरला नदीपात्रातून ते पोहत जात होते. नदीच्या पाण्याचा प्रवाहसुद्धा अधिक होता. तरीही पोहण्याची सवय असल्याने ते नेहमीप्रमाणे पोहत होते.हरीपूरच्या दिशेने काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला. पाण्यात ते पालथे पडल्याचे पाहून क्लबच्या काही खेळाडुंना शंका आली. त्यांनी शिंदे यांना काठावर नेले. त्यावेळी त्यांच्या छातीत वेदना होत होत्या. त्याठिकाणी पुन्हा त्यांना धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने खेळाडू व मंडळाच्या सभासदांना धक्का बसला. सांगलीतील जलतरणपटुंनाही ते परिचीत होते. शांत व मनिमळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. तरुण भारत व्यायाम मंडळाशी गेली पन्नास वर्षे ते जोडले गेले होते. येथील अनेक क्रीडा उपक्रमांत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.