मिरज : कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटक सीमाभागात आंदोलने सुरु असल्याने, सांगली पाटबंधारे मंडळाने राजापूर बंधाºयाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.पाण्याच्या मागणीसाठी यापूर्वीही शिरोळ तालुका सीमेवरील राजापूर बंधाºयावर कर्नाटकातील ग्रामस्थांनी हल्ला करून मोडतोड केली होती. या पार्श्वभूमीवर यावेळीही तीव्र पाणीटंचाई असल्याने राजापूर बंधाºयाच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत आहे.राजापूर बंधाºयापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील कोयना धरणातून कर्नाटकात अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्याची मागणी सुरु आहे.
अथणी व कागवाड तालुक्यात नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावात तीव्र पाणीटंचाई आहे. हिप्परगी धरण कोरडे असल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावल्याने अथणी व कागवाड तालुक्यात गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी बंद, धरणे आंदोलन सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र पाणी सोडण्यात आले नसल्याने पाण्यासाठी राजापूर बंधाºयावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने, सांगली पाटबंधारे विभागाने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बंधाºयासाठी १५ जूनपर्यंत शस्त्रधारी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.