Sangli: कट रचला एकाविरूद्ध अन् ‘गेम’ केली दुसऱ्याची; हरिपूर येथे वेटरचा खूनप्रकरणी सात संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 12:15 PM2024-12-05T12:15:09+5:302024-12-05T12:15:34+5:30
सांगली : तो पुण्याहून आल्याची खबर मिळाली. पूर्वीचा राग धुमसत असल्याने काटा काढायचे ठरवले. संशयित मध्यरात्री दुचाकीवरून मारण्यासाठी निघाले. ...
सांगली : तो पुण्याहून आल्याची खबर मिळाली. पूर्वीचा राग धुमसत असल्याने काटा काढायचे ठरवले. संशयित मध्यरात्री दुचाकीवरून मारण्यासाठी निघाले. यावेळी वाटेत एकजण आडवा आला. त्याच्याशी खटका उडाल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हरिपूर (ता. मिरज) येथील मठासमोर मध्यरात्री हा प्रकार घडला.
तब्बल २४ वार झाल्यामुळे हॉटेलमधील वेटर सुरज अलिसाब सिद्धनाथ (वय ३२, रा. पवार प्लॉट, हरिपूर रस्ता) हा जागीच मृत झाला तर ज्याची ‘गेम’ होणार होती तो सुदैवाने बचावला. या खूनप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
मृत सुरज याचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील बनहट्टी येथील आहेत. अनेक वर्षांपासून कुटुंब सांगलीत पवार प्लॉट परिसरात राहते. सुरज याचे लग्न झाले असून, तो अंकली येथील वीटभट्टीवर काम करत होता तर सायंकाळनंतर हरिपूर येथे हॉटेल संगममध्ये वेटरचे काम करत होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता. मध्यरात्री एका मित्राने त्याला जेवण पार्सल घेऊन येण्यास सांगितले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास सुरज दुचाकी (एमएच १० एएन २२३२) वरून घराकडे येत होता.
संशयित युवक याचवेळी हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते. सुरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारल्याच्या शुल्लक कारणातून वाद झाला. संशयितांनी पुढे जाऊन हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ त्याला अडवले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर सुरज जीव वाचवण्यासाठी हरिपूरच्या दिशेने पळू लागला. काही अंतरावर एका घरासमोर तो कोसळला. तेथे गाठून हल्लेखोरांनी पुन्हा वार केले. रक्तस्त्राव होऊन सुरजचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सुरज जेवणाचे पार्सल का घेऊन आला नाही म्हणून मित्राने एकाला हॉटेलकडे पाठवले. त्याला वाटेत सुरज मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याने हा प्रकार सुरजच्या घरी सांगितला. खुनाची माहिती मिळाल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावले. मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिलमध्ये मृतदेह पाठवला. सुरजवर २४ वार झाले आहेत. सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली.
अल्पवयीन चौघांसह सात ताब्यात
सुरजच्या खुनानंतर ग्रामीण पोलिस, गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलिसांनी सूत्रे हलवली. बुधवारी सायंकाळपर्यंत सात जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी चौघे अल्पवयीन असून, तिघे सज्ञान आहेत. अल्पवयीनपैकी एक सराईत गुन्हेगाराचा मुलगा आहे तर एका अल्पवयीन युवकावर हाफ मर्डरचे तीन गुन्हे दाखल आहेत.
आठवड्यात वेटरचा दुसरा खून
सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलजवळ कोकणातील वेटर शैलेश राऊत याचा खून झाला होता. त्यानंतर सुरज सिद्धनाथ याचा खून झाला. आठवड्यात दोन वेटरचे खून झाल्याने याची चर्चा रंगली आहे.
सुदैवाने तो बचावला
हरिपूर रस्ता परिसरातील स्वप्निल नामक तरुणाचा संशयितांशी वाद झाला होता. स्वप्निलने एकाला मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर राग होता. स्वप्निल पुण्यात नोकरीस होता. तो सांगलीत आल्याचे समजताच खुनाचा कट रचला. परंतु, वाटेत सुरजशी वाद झाल्यामुळे त्याचाच खून केला. स्वप्निल सुदैवाने बचावला. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केली.