सांगली : कोरोनातील थकबाकीमुळे महावितरणचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीमुक्त गावासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या मांगले शाखा कार्यालयाच्या क्षेत्रातील सात गावांतील एक हजार ५८४ ग्राहकांनी ५६ लाख ७९ हजार रुपये थकीत वीजबिल भरले आहे. सातही गावे शंभर टक्के थकबाकीमुक्त झाल्यामुळे महावितरणला माेठा दिलासा मिळाला आहे.
महावितरणची जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक एक लाख ९५ हजार ४२९ वीज ग्राहकांकडे १४७ कोटी रुपयांची थकबाकी होती. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम राबिवली आहे. यामुळे जवळपास ६० टक्क्यांहून अधिक वसुली झाली आहे. कृषी पंपाच्या वीज ग्राहकांकडूनही वीज बिलाची वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविली असून, ५० टक्के वीज सवलत दिली जात आहे. काही कृषी पंपाच्या ग्राहकांनीही वीजबिल भरण्यास सुरुवात केली आहे. घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांमध्ये वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरण कंपनीकडून गाव पातळीवर जनजागृती केली जात आहे. महावितरणकडून शाखा कार्यालय, गावे शंभर टक्के थकबाकीमुक्त करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात आहे. या मोहिमेत इस्लामपूर विभागातील शिराळा उपविभागांतर्गत असलेल्या मांगले (ता. शिराळा) शाखा कार्यालयाने कार्यक्षेत्रातील सात गावे शंभर टक्के थकबाकीमुक्त केली आहेत. यामध्ये मांगलेसह देववाडी, लादेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, चिमटेवाडी व पवारवाडी या गावातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक एक लाख ५८४ ग्राहकांनी ५६ लाख ७९ हजार रुपयांचे वीजबिल भरणा केले आहे. कार्यकारी अभियंता संतोष कारंडे व उपविभागीय अभियंता प्रल्हाद बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता स्वप्नजा गोंदील, जनमित्र राजेंद्र माने, क्षीरसागर गजबे यांनी विशेष कामगिरी केली आहे.