प्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 03:18 PM2021-06-07T15:18:37+5:302021-06-07T15:22:49+5:30

सांगली : 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांंपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. प्लेगची लस ...

Shahu Maharaj gave prizes to those who were vaccinated against plague | प्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे

प्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे

googlenewsNext
ठळक मुद्देप्लेगची लस घेणाऱ्यांना शाहू महाराजांनी दिली होती बक्षिसे प्रा. डॉ. विलासराव पोवार यांचे विवेचन

सांगली : 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १२५ वर्षांंपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले कार्य आजही अनुकरणीय आहे. प्लेगची लस प्रथम स्वत: टोचून घेतली, लस घेणाऱ्यास रजा, रोख बक्षिसे जाहीर केली. याचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विलासराव पोवार यानी केले.

मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी प्रशासन, प्रबोधन, आरोग्य, उपचार, आर्थिक मदत, पुर्नवसन यांचा मेळ साधत शास्त्रशुद्ध उपाययोजना राबवल्या, त्यामुळे प्लेगच्या संकटावर मात करता आली असे डॉ. पोवार म्हणाले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ऑनलाईन अंक प्रकाशनावेळी डॉ. पवार बोलत होते.

'प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य' या विषयावर विवेचन केले. पत्रकार विजय चोरमारे अध्यक्षस्थानी होते. डॉ. पोवार म्हणाले, महाराजांनी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारन्टाईन केले. अपंग, दिनदुबळे व गरजूंसाठी अन्नदान सुरु केले. मजुरांना रोजगार दिला.

यात्रा-जत्रा व उत्सवांवर बंधने घातली. साठेबाजी व महागाई करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले. प्लेगने मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन दिले. जनतेचे दागदागिने, मौल्यवान वस्तू राजदरबारातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्याची सोय केली.

पोवार यांनी सांगितले की, महाराजांनी लोकानुनय न करता प्लेग निर्मूलनासाठी शास्त्रीय उपायांची कठोर अंमलबजावणी केली. त्यांचा प्लेगविरोधी जाहीरनामा, करवीर सरकारचे गॅझेट व वेळोवेळी काढलेल्या अधिकृत हुकुमांच्या आधारे प्लेगमधील कामांंची माहिती मिळते.

यावेळी चोरमारे यांच्याहस्ते अंनिस वार्तात्राच्या जूनच्या अंकाचे प्रकाशन झाले. चोरमारे यांनी शाहू महाराज व आजच्या राज्यकर्त्यांमध्ये तुलना केली. संयोजन अनिल चव्हाण, मधुकर गायकवाड, राहुल थोरात आदींनी केले.

टाळ्या आणि थाळ्यांची भंपकगिरी 

चोरमारे म्हणाले, आजचे राज्यकर्ते टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा असे भंपक व अवैज्ञानिक कार्यक्रम करत आहेत. महाराजांनी टीका करणाऱ्या वृत्तपत्रांनाही मोठ्या मनाने मदत केली, मात्र आजचे राज्यकर्ते माध्यमांची मुस्कटदाबी करताहेत. शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास केल्यास त्यांना मार्ग सापडेल".

Web Title: Shahu Maharaj gave prizes to those who were vaccinated against plague

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.