नागपंचमीच्या बैठकीला शिराळकरांची दांडी
By admin | Published: July 18, 2014 11:50 PM2014-07-18T23:50:06+5:302014-07-18T23:58:50+5:30
दीपेंद्रसिंह कुशवाह : आदेशाचे पालन करा; जिवंत नाग पकडून त्याची पूजा व खेळविण्याचा प्रयत्न करू नये
सांगली : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील ग्रामस्थांनी नागपंचमी साजरी करावी. जिवंत नाग पकडून त्याची पूजा व त्याला खेळविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी कुशवाह यांनी बोलाविलेल्या प्रबोधनात्मक बैठकीला शिराळकरांनी दांडी मारली. यावरून त्यांचा या आदेशाला विरोध असल्याचे दिसून येते.
कुशवाह म्हणाले की, जिवंत नाग पकडण्यास बंदी आहे. त्यामुळे नागप्रेमी मंडळांनी कुठेही नाग पकडू नये. शिराळ्यातील एकही मंडळ नोंदणीकृत नाही. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. जिवंत नाग पकडून त्याची पूजा करू नये, तसेच त्याला खेळवू नये, असा १९७२ ला कायदा झाला आहे. तरीही त्याची अंमलबजावणी करण्याची ग्रामस्थांची तयारी नसल्याचे दिसून येते. मात्र आता आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या भावना व श्रद्धा दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. नागपंचमीला अजून तेरा ते चौदा दिवसांचा कालावधी आहे. या काळात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जाईल. गाव बंद ठेवून ते या निकालाचा निषेध करीत असले तरी, त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे पालन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे.
ते म्हणाले की, न्यायालयाने काय आदेश दिला आहे, नागपंचमी कशी साजरी करावी, यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. शिराळ्यात प्रशासनातर्फे पोस्टर्स लावली जाणार आहेत. प्रसिद्धीपत्रकांचेही वाटप केले जाणार आहे. प्रबोधन करण्याची ग्रामपंचायतीचीही जबाबदारी आहे. विशेष सभा बोलावून त्यांनी तसा ठराव करून घ्यावा. सरपंचांनाही न्यायालयाच्या आदेशाला विरोध करता येणार नाही. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी आज कार्यालयात बैठक बोलाविली होती. मात्र एकाही ग्रामस्थाने बैठकीला हजेरी लावली नाही. (प्रतिनिधी)
या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत उपस्थित होते. ते म्हणाले की, न्यायालयाचा आदेश झुगारून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. नागपंचमीदिवशी बाहेरून बंदोबस्त मागविण्याची गरज आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलीस सक्षम आहेत. यापूर्वी नागपंचमी साजरी करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे. आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.