सांगली : सांगली शहरातील कृष्णा नदीत बुडणाऱ्या तीन शाळकरी मुलांना रॉयल कृष्णा बोट क्लबच्या तरुणांनी धाडसाने वाचविले. सोमवारी दुपारी हा थरारक प्रकार घडला.सध्या उन्हाच्या झळा वाढत असल्याने कृष्णा काठावर नागरिक पोहण्यासाठी जातात. सांगलीतील टिंबर एरियामधील आदित्य सातपुते (वय १५), अंकुश सातपुते (१३) व सचिन पाटील (१४) हे तिघे अन्य मित्रांसोबत कृष्णा काठावर पोहण्यास गेले होते. आदित्य सातपुते याला पोहता येत नसल्याने तो नदीकाठावर बसला होता.
काही वेळाने तो पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून अंकुश सातपुते व सचिन पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र भीतीमुळे आदित्यने त्या दोघांनाही मिठी मारली. यामुळे तिघेही बुडू लागले.हा प्रकार रॉयल कृष्णा बोट क्लबचे गजानन नरळे व प्रतीक जामदार यांनी पाहिला. त्यांनी क्षणार्धात पाण्यात उतरुन तिघा मुलांना पाण्याबाहेर काढले. गजानन व प्रतीकच्या धाडसामुळे या तिन्ही मुलांचा जीव वाचला.