सांगलीत पसरली धुक्याची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:05 PM2021-02-17T12:05:48+5:302021-02-17T12:07:56+5:30
environment Sangli News- सांगली जिलह्याच्या हवामानातील लहरीपणा कायम असून बुधवारी अचानक शहर व परिसरात धुक्यांनी हजेरी लावली. दोन तास धुक्याची चादर शहरात पसरली होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सांगली : जिलह्याच्या हवामानातील लहरीपणा कायम असून बुधवारी अचानक शहर व परिसरात धुक्यांनी हजेरी लावली. दोन तास धुक्याची चादर शहरात पसरली होती. तापमानातही काहीअंशी घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सांगली शहर व परिसरात पहाटे साडे पाच वाजल्यापासून धुके पसरले होते. साडे सातपर्यंत हे धुके कायम होते. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून जाताना कसरत करावी लागली.
फेब्रुवारीत हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कधी थंडी, कधी सामान्य तापमान, कधी ढगांची दाटी तर कधी धुके अशा विचित्र वातावरणास सांगलीकरांना सामोरे जावे लागत आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शासकीय व खासगी दवाखान्यात त्यामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत.
हवामानाचा हा लहरीपणा आणखी आठवडाभर राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या दोन दिवसांत ढगांची दाटी व काहीठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रवात तयार झाला असून, केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात १७ फेब्रुवारीस अवकाळी पावसाची चिन्हे आहेत.