Sangli Politics: आगामी काळात जयंत पाटील यांची भूमिका काय ?, शिंदेसेनेची ऑफर असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 06:14 PM2024-12-10T18:14:20+5:302024-12-10T18:19:29+5:30
अजित पवार यांनीही विधानसभेत टोकले
अशोक पाटील
इस्लामपूर : राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी अभिनंदनाच्या ठरावावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी भाषण केले. त्यावेळी पाटील यांनी मी १९९० साली आमदार म्हणण्याऐवजी चुकून अध्यक्ष म्हणून सभागृहात आलो, असा शब्द वापरला. त्यावर हस्तक्षेप करीत अजित पवार यांनी आमदार म्हणा, असे टोकले. यावर जयंत पाटील यांनी दादांचे माझ्यावर किती लक्ष आहे बघा, असा टोला मारला, तसेच योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असा खुलासा केला. यावर आगामी काळात पाटील यांची भूमिका काय असणार? याची इस्लामपूर मतदारसंघात चर्चा सुरू झाली.
विधानसभेच्या सभागृहात आमदार जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असा आपल्या पक्षाचा नियम असल्याचे म्हटले. त्यावरून राष्ट्रवादी गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यावर शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी जयंत पाटील यांना शिंदेसेनेची ऑफर दिली. त्यामुळे जयंत पाटील यांची पुढील भूमिका काय असेल? यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिंदेसेनेच्या काही नेत्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेची ऑफर दिल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे. विधानसभा निवडणूक निकालापासून आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. थेट विधानसभा गृहात आपली उपस्थिती दाखवत काही गोष्टींचा उलगडा त्यांनी केल्याचे स्पष्ट होत चालले आहे. इस्लामपूर मतदारसंघातून आठव्यांदा निवडणूक लढवली असली, तरी मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याची सल पाटील यांच्या मनाला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांतही शांतता आहे.
मतदारसंघाचे राजकारण निर्णायक वळणार..
आगामी काळात आमदार जयंत पाटील यांचा काय निर्णय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या सभागृहातील कलगी-तुऱ्यामुळे आगामी काळात इस्लामपूर मतदारसंघातील राजकारण वेगळ्या व निर्णायक वळणार जाण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीकडे आमदार जयंत पाटील यांनी पाठ फिरवली; पण इस्लामपूर मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कोणालाही प्रतिक्रिया देऊ नका, शांत राहा, असा कानमंत्र देऊन अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले.