महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार, केंद्रीय मंत्री आठवलेंचे भाकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:30 PM2021-11-27T13:30:04+5:302021-11-27T13:32:16+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री आठवलेंनेही महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे.
सांगली : महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप-सेना युतीचे सरकार येईल असे भाकीत केंद्रीय सबलीकरण व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सांगलीत माता रमाई आंबेडकर उद्यानाच्या कामांच्या पाहणीसाठी आले असता त्यांनी हे भाकीत केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच सत्ताबदलाचे सुतोवाच केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मार्चपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असे सांगितले होते. आठवले यांनी या नेत्यांच्या वक्तव्यांना दुजोरा दिला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच जाईल.
सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हाव्यात, विरोधकांनी गोंधळ घालू नये असे आवाहनही आठवले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेतले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनीही आंदोलन थांबवावे. आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका असेल तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.