वाळवा-शिराळ्यात खासदार दाखवा अन्..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:17 PM2019-12-28T15:17:01+5:302019-12-28T15:18:25+5:30
लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे ह्यखासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवाह्ण असे बोलले जात आहे. वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा असे बोलले जात आहे.
वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे.
वाळवा-शिराळा कऱ्हाड लोकसभा मतदार संघात असताना आनंदराव चव्हाण, प्रमिलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्यात आले होते. हे तालुके हातकणंगले मतदार संघात गेल्यानंतर निवेदिता माने, राजू शेट्टी यांनी प्रतिनिधीत्व केले.
२0१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण, हा प्रश्न भाजप-शिवसेना युतीपुढे होता. अंतिम टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांना शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली.
माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.