अविनाश कोळी ।सांगली : बीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. २० कॅरेटला हॉलमार्क मान्यता नसल्यामुळे येत्या वर्षभरात या दागिन्यांची विक्री न झाल्यास ती मोडीत काढावी लागणार आहेत. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना नुकसानीस सामोरे जावे लागेल.
सांगली जिल्हा सराफ असोसिएशनने आता २० कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्क मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणची उलाढालही मोठी आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये २० कॅरेट दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे येथील सराफ व्यावसायिकांकडे मागणीच्या तुलनेत अशा दागिन्यांचा मोठा साठा शिल्लक आहे. हॉलमार्कचे बंधन १५ जानेवारी २०२० पासून लागू झाले आहे. सराफांना बीआयएस हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातही १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांनाच प्रमाणित मानण्यात आले आहे.
यामध्ये २० कॅरेटच्या दागिन्यांचा समावेश नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २० कॅरेट दागिन्यांचा साठा अधिक आहे. त्याठिकाणी याचप्रकारच्या दागिन्यांना मागणी आहे. वीस कॅरेटचा शिल्लक साठा संपविण्यासाठी शासनाने एक वर्षाची मुदत दिली आहे, म्हणजेच १५ जानेवारी २०२१ पर्यंतच हे दागिने विकता येतील. त्यानंतर हे दागिने वितळवून दुसरे तयार करावे लागतील. सध्याचा जिल्ह्यातील साठा पाहिल्यास, त्याची वर्षभरात संपूर्ण विक्री होईल, असे सराफ व्यावसायिकांना वाटत नाही. दागिने घडविण्याची प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे पुढीलवर्षी अशाप्रकारचे शिल्लक दागिने वितळविण्याची वेळ आली, तर कोट्यवधी रुपयांचा तोटा सराफांना सहन करावा लागेल. त्यामुळे सराफ आता चिंतेत सापडले आहेत. १५ जानेवारी २०२१ पासून या दागिन्यांची खरेदी-विक्री होणारच नाही. तसा प्रयत्न झाल्यास व्यावसायिकांना दंड होणार आहे.
- हॉलमार्क केंदे्र वाढविण्याची गरज
हॉलमार्कची १२ केंद्रे जिल्ह्यात आहेत. विशेषत: ती शहरी भागातच आहेत. तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्कचे केंद्र उभारल्यास ग्रामीण सराफांना त्याचा लाभ होऊ शकतो. जिल्ह्यातील सोने-चांदी दागिन्यांची उलाढाल मोठी असल्याने आणखी हॉलमार्क केंद्रे वाढविण्याची आवश्यकता आहे.
सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात अधिक प्रमाणात २० कॅरेटच्या सोन्याला मागणी आहे. ग्रामीण व्यावसायिकांकडे अशा दागिन्यांचा साठा आहे. त्यामुळे त्यांना नुकसानीची चिंता आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही २० कॅरेटला मान्यता मिळावी, अशी मागणी करीत आहोत. तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्क केंद्र उभारण्यासाठीही आमचा आग्रह राहील.- जितेंद्र पेंडूरकर, जिल्हाध्यक्ष, सराफ असोसिएशन
२० कॅरेटच्या दागिन्यांना सांगली जिल्ह्यात मोठी मागणी आहे. अशाप्रकारच्या दागिन्यांचा शिल्लक साठा मोठा आहे. मंदीच्या काळात वर्षभरात या दागिन्यांची विक्री करणे कठीण असून, वर्षभराने ते वितळविण्याची वेळ आली, तर फार मोठे नुकसान सोसावे लागेल.- किशोर पंडित, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफ असोसिएशन