सांगलीच्या बाजारपेठांचे पोलिसांकडून शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:22+5:302021-04-08T04:26:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनला विरोध करीत व्यापाऱ्यांनी सुरू केलेली दुकाने बुधवारी पोलीस बळाद्वारे बंद करण्यात आली. गणपती ...

Shutters down from Sangli markets by police | सांगलीच्या बाजारपेठांचे पोलिसांकडून शटर डाऊन

सांगलीच्या बाजारपेठांचे पोलिसांकडून शटर डाऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊनला विरोध करीत व्यापाऱ्यांनी सुरू केलेली दुकाने बुधवारी पोलीस बळाद्वारे बंद करण्यात आली. गणपती पेठेत सकाळी पोलीस व व्यापाऱ्यांत यावरून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर, पोलिसांच्या कारवाईमुळे बाजारपेठा पुन्हा कुलुपबंद करण्यात आल्या. कारवाईबद्दल व्यापारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

सांगलीत मंगळवारपासून व्यापारी आक्रमक भूमिकेत आहेत. मंगळवारी शासनाचे लॉकडाऊनचे आदेश धुकावून सांगली शहातील सर्व बाजारपेठा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, जिल्हा प्रशासन व महापालिकेने पोलीस बळाचा वापर करून, बुधवारी सकाळपासून दुकाने बंद करण्याची मोहीम सुरू केली. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनीही व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पाेलीस अधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्यांना नियमाचे पालन करण्याबाबत सूचना दिली. गणपती पेठेत दुकाने बंद करण्यासाठी पोलीस आल्यानंतर व्यापारी व त्यांच्यात वादावादी झाली.

दुपारी बारा वाजेपर्यंत पोलिसांनी सर्व बाजारपेठा बंद करायला लावल्या. आदेशाचा भंग केल्यास कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दुपारनंतर अचानक शांतता पसरली. सांगलीत हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ, सराफ पेठ, स्टँड रोड, शिवाजी मंडई परिसर, सांगली मार्केट यार्ड, विश्रामबाग, शंभर फुटी रस्ता या ठिकाणच्या मुख्य बाजारपेठा ओस पडल्या.

सायंकाळपर्यंत पोलिसांचा फौजफाटा शहरात फिरत होता. पोलिसांनी बुधवारी सर्वच ठिकाणी संचलन वाढविले. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त कायम होता. विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्यात आली.

चौकट

माधवनगरमध्येही पोलिसांची कारवाई

माधवनगरमध्येही मंगळवारी बाजारपेठ सुरू होती. बुधवारी सकाळी नऊ वाजता पोलिसांनी येथील सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांना आदेशाची माहितीही दिली.

चौकट

व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कायम

दुकाने बंद केली असली, तरी व्यापाऱ्यांमधून शासनाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त होत होता. महिनाभर जगायचे कसे व कामगारांच्या उदरनिर्वाहाचे काय होणार, याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

चौकट

व्यापाऱ्यांची बैठक

शासनाच्या या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घ्यायची, याविषयी व्यापाऱ्यांनी चर्चा केली. बैठकीत शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Shutters down from Sangli markets by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.