भारतीय तांदळाची आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी, विक्रमी निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:01 PM2021-03-19T15:01:16+5:302021-03-19T15:03:14+5:30
Rice Food Sangli- भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगर बासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यात वाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यात आणखी उच्चांकी वाढ होण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.
अविनाश कोळी
सांगली : भारतीय तांदूळ उत्पादक, निर्यातदारांची कोरोनाच्या संकटकाळातही चांदी झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत ५.३१ टक्के, तर बिगर बासमती तांदळाची १२२.६१ टक्के निर्यात वाढ नोंदली गेली आहे. येत्या दोन महिन्यात आणखी उच्चांकी वाढ होण्याचा अंदाज ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना वर्तविला आहे.
भारतातून मोठ्या प्रमाणावर दरवर्षी बासमती व बिगर बासमती तांदळाची निर्यात होत असते. बासमती तांदळापैकी ८० टक्के माल मध्य-पूर्व देशात म्हणजेच अरब राष्ट्रांमध्ये जात असतो. यातील अनेक देशांनी कोविड कायम राहण्याच्या भीतीने मागणीपेक्षा जास्त तांदळाची साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर ३.८ मिलियन टन (३३,८०,६५४ टन) झाली आहे. मार्चअखेर ती ४.५ मिलियन टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, बासमतीपेक्षा बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा उच्चांक नोंदला जाणार आहे. २०१९-२० मध्ये ५ मिलियन टन तांदूळ निर्यात झाला होता. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२१ पर्यंत ९.६ मिलियन टन तांदळाची निर्यात झाली आहे. मार्चअखेर ही निर्यात १४ मिलियनपर्यंत जाऊ शकते.
थायलंड, व्हिएतनाम व पाकिस्तान या तांदूळ निर्यातदार व स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदळाचा दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० डॉलरने कमी आहे. भारतातील ७० टक्के माल अफ्रिकन देशात जातो. ज्याठिकाणी दरांची मोठी स्पर्धा असते. त्यामुळे भारतीय तांदळाला मागणी अधिक आहे.
निर्यात वाढत असताना देशांतर्गत बाजारात बिगर बासमती तांदळाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही महिन्यात हे दर चढेच राहणार आहेत. इंधन दरवाढीचाही त्यावर परिणाम आहे.
विनोद कौल यांनी सांगितले की, देशात यंदा तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या काही वर्षातील निर्यातीचा उच्चांक यंदा नोंदला जाईल. पुढील आर्थिक वर्षातही तांदळाच्या निर्यातीला अत्यंत चांगले वातावरण राहील.