पोसेवाडीच्या बाप-लेकीचा एकाचवेळी सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:22 AM2021-01-02T04:22:53+5:302021-01-02T04:22:53+5:30
विटा : पोसेवाडी (ता. खानापूर) येथे लक्ष्मीनारायण पुरातन वस्तुसंग्रहालयात विविध वस्तूंचा संग्रह जतन करणारे भगवान जाधव व नृत्य आणि ...
विटा : पोसेवाडी (ता. खानापूर) येथे लक्ष्मीनारायण पुरातन वस्तुसंग्रहालयात विविध वस्तूंचा संग्रह जतन करणारे भगवान जाधव व नृत्य आणि अभिनय क्षेत्रात योगदान देत असलेल्या त्यांची कन्या प्रतीक्षा या बाप-लेकीची ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
पोसेवाडी येथील भगवान जाधव यांनी लक्ष्मीनारायण पुरातन वस्तुसंग्रहालय स्थापन केले आहे. त्यात साडेसातशे वर्षांपूर्वीच्या जुन्या मूर्ती, नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, विविध जुनी वजने-मापे, कॅमेरे, अडकित्ते, पानपुडे, दिवे, आरत्या, पणत्या, कुंकवाचे करंडे, कंदील, जुनी भांडी, गॅसच्या बत्त्या, तलवारी, भाले, ग्रामोफोन, रेडिओ, चरख्यांचे प्रकार यासह विविध १२ हजार वस्तूंचा संग्रह करून त्याचे १२० ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच वाचनालयाची स्थापना करून वाचनसंस्कृती रूजविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे ते ३२ विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
त्यांची कन्या प्रतीक्षा हिनेही पर्यावरण क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळविले आहेत. भरतनाट्यम् नृत्य व लावणीमध्ये २०१५ ते २०१७ या सलग तीन वर्षांत तिने तीन विश्वविक्रम केले आहेत. या विश्वविक्रमांची नोंद गिनिज बुक, मार्बल बुक, इंडिया बुक, हायरेंज बुकमध्ये झाली आहे. नृत्यस्पर्धेतही तिने यश मिळविले आहे. त्याची दखल घेऊन ओएमजी नॅशनल बुकने या बाप-लेकीची निवड करून एकाचवेळी या दोघांचा सन्मान केला. त्यांना नितीन चंदनशिवे, दत्तात्रय शिंदे, नानासाहेब मंडलीक, विष्णू जाधव, गणेश धेंडे, प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे, डॉ. वैशाली हजारे यांचे सहकार्य मिळाले.
फोटो - ०१०१२०२१-विटा-पोसेवाडी : पोसवाडी (ता.खानापूर) येथील भगवान जाधव व त्यांची कन्या प्रतीक्षा यांची नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये नोंद करून त्यांना सन्मानित करण्यात आले.