साहेब, अर्जंट आहे दवाखान्यात जायचं आहे...भाजी आणायचीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:43+5:302021-04-13T04:24:43+5:30
सांगली : ‘साहेब...अर्जंट आहे हो, दवाखान्यात जायचं आहे...दोन दिवस सगळं बंद असणार माहीत नव्हतं... भाजीपाला आणायचा आहे, अशी कारणे ...
सांगली : ‘साहेब...अर्जंट आहे हो, दवाखान्यात जायचं आहे...दोन दिवस सगळं बंद असणार माहीत नव्हतं... भाजीपाला आणायचा आहे, अशी कारणे देऊन कडक लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी व रविवारी असे दोन दिवस लॉकडाऊन असतानाही तीच ती कारणे देऊन अनेक जण बाहेर फिरत होते. त्यामुळे शनिवारी ३६६ केसेस, तर रविवारी ३९६ केसेस करण्यात आल्या.
शुक्रवारी रात्री आठपासूनच पोलिसांनी रस्त्यावर उतरत संचारबंदीची अंमलबजावणी सुरू केली होती. शनिवारी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.
शहरात फिरणाऱ्यांना हटकले की नेहमीच्याच स्वरात अर्जंट आहे, दवाखान्यात जात आहे, असे सांगत होते. मात्र, कोणत्या दवाखान्यात जाणार, काय झालं आहे हे सांगता येत नव्हते. त्यामुळे अशांवर पोलिसांनी कारवाई केली.
चौकट
शनिवारी ३६६ जणांवर कारवाई
शुक्रवारी रात्रीपासूनच संचारबंदी असतानाही त्याकडे काहींनी दुर्लक्ष केले होते. चौकाचौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखत बाहेर न फिरण्याविषयी प्रबोधन करीत दंडही केला. दिवसभरात ३६६ केसेस दाखल करीत ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यात दुचाकीवरून ट्रीपल सीट फिरणे, वेगाची मर्यादा ओलांडणे आदी गैरप्रकारांचा समावेश होता, तर विनामास्क फिरणाऱ्या ११८ जणांवर कारवाई करीत २६ हजार दंड वसूल करण्यात आला.
चौकट
रविवारी ३९६ जणांवर कारवाई
कडक लॉकडाऊन, संचारबंदीतही दुसऱ्या दिवशी रविवारीही अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना आढळून आले. ३९६ जणांवर केसेस दाखल करीत दंड आकारण्यात आला. यात मोटार वाहन कायद्यानुसार २२० केसेस, तर दारूबंदी कायद्यानुसार ६ केसेस दाखल करीत ९ हजार १३५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या शंभर जणांवर यावेळी कारवाई करण्यात आली.
चौकट
रस्ता बनला सायकल ट्रॅक
शनिवार, रविवार दोन्ही दिवशी पूर्ण संचारबंदी लागू असतानाही सायंकाळच्या सुमारास अनेक नागरिक सायकल घेऊन बाहेर पडले होते. त्यात महिला आघाडीवर होत्या. यातील अनेक महिला विनामास्क रस्त्यावर सायकलवरून रपेट मारत असल्याने शहरातील प्रमुख मार्ग सायकल ट्रॅक बनला होता.