सांगली : नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागात किर्लोस्कर कंपनीच्या अधिकाऱ्यास दांडक्याने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. संशयितांनी केलेल्या मारहाणीत आण्णासाहेब हणमंत जाधव (रा.दुधारी, ता.वाळवा) हे गंभीर जखमी झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कुंडल व पलूस पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी निसार सरदार मुलाणी (वय २४), अक्षय सुरेश गायकवाड (२५), धर्मवीर उर्फ आप्पा अमृतराव गायकवाड (३५), शुभम शरद जाधव (२५), विशाल शिवाजी पवार (३०, सर्व रा.नागराळे, ता.पलूस) आणि अशोक हंबीरराव शिंदे (२८ रा.नवी पुणदी ता.पलूस) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि. १५ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास किर्लोस्कर कंपनीत विभागीय अधिकारी असलेले फिर्यादी जाधव हे आपल्या मोटारीतून जात असताना, संशयितांनी त्यांची मोटार थांबवत, दगडाने व दांडक्याने मोटारीच्या काचा फोडल्या व जाधव यांना वाहनातून खाली ओढून घेत, त्यांना दांडके, पाइप, बेसबॉल स्टिकने हातावर, पायावर व डोक्यात मारून, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर संशयित पसार झाले होते. एलसीबीसह कुंडल व पलूस पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित नागराळे व कुंडल येथे आहेत. त्यानुसार, पोलीस पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी सांगितले की, जाधव यांनी आम्हास कामावरून कमी केले होते. त्याचा राग मनात धरून किर्लोस्करवाडी ते कुंडल रोडवर कोरोकोट कंपनीच्या पुढील बाजूस त्यांना अडवून मारहाण केल्याची सांगितले.
या प्रकरणाचा एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कुंडलच्या सहा.निरीक्षक संगिता माने, पलूसचे सहा.निरीक्षक विकास जाधव, संदीप गुरव, सतीश आलदर, मच्छींद्र बर्डे, अजय बेंद्रे, अरुण सोकटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.