संख : जत तालुक्यातील संख, उमदी, घोलेश्वर, सोनलगी, काराजनगी येथे ओढापात्रातून अवैध वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर तसेच वळसंग येथे मुरूम उपसा करणारे दोन ट्रॅक्टर व जेसीबी महसूल विभागाच्या पथकाने गेल्या आठवडाभरात छापा टाकून पकडले. जप्त केलेली वाहने संख अप्पर तहसील कार्यालय व उमदी पाेलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहेत.
पूर्व भागातील बोर नदीपात्रात वाळू तस्करीचे केंद्र आहे. लाॅकडाऊनचा फायदा घेत अवैध वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत हाेते. संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व त्यांच्या पथकाला गस्त घालताना उमदी येथे २८ एप्रिल व ४ मे रोजी उमदी येथील २ ट्रॅक्टर, ५ मे रोजी वळसंग येथील बंडगर वस्ती येथे मुरूम उत्खनन करत असताना, २ ट्रॅक्टर, १ जेसीबी पकडून संख अप्पर तहसील आवारात लावण्यात आला. ६ मे रोजी संख-आसंगी रस्त्यावरून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. ७ मे रोजी पहाटे २ वाजता घोलेश्वर-काराजनगी हद्दीत रस्त्यावरून वाळू घेऊन निघालेला ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. या सर्वांवर कारवाई केली.
तलाठी राजेश चाचे, गणेश पवार, नितीन कुंभार, विशाल उदगेरी, हणमंत बामणे, मालू बंडगर, राहुल कोळी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
काेट
ट्रॅक्टर मालकांना नोटीस दिली जाणार आहे. त्याच्यावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे. तसेच यापुढेही वाळू तस्करीविरोधात कडक मोहीम राबविली जाणार आहे.
- हणमंत म्हेत्रे, अप्पर तहसीलदार
फोटो : ०७ संख १
ओळ : जत तालुक्यातील ओढा पात्रात अवैध वाळू, मुरुम उपसा करत असताना, महसूल विभागाच्या पथकाने सहा ट्रॅक्टर व एक जेसीबी ताब्यात घेतला.