आयर्विनच्या पर्यायी पुलाचे घोंगडे भिजतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:29 PM2020-02-28T22:29:53+5:302020-02-28T22:32:18+5:30
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पर्यायी पूल उभारणीस सांगलीवाडीतील नागरिक व शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. यामुळे ...
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पर्यायी पूल उभारणीस सांगलीवाडीतील नागरिक व शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. यामुळे ठेकेदाराने काम सुरू करण्याचे धाडस केलेले नाही. त्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हालचालीही थंडावल्या आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात विरोध कमी करण्याचे कोणतेच प्रयत्न न झाल्याने, या पुलाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे.
दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार आहे. पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला वर्कआॅर्डरही देण्यात आली आहे. मुख्य रस्ता-कापड पेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल आहे. आयर्विन पुलाजवळूनच १० मीटर अंतर सोडून पर्यायी पूल उभारला जाणार आहे. या नव्या पुलावर जाण्यासाठी टिळक चौक व पांजरपोळ या दोन्ही ठिकाणी वाय टाईप रस्ता ठेवला आहे. पुलाची उंची आयर्विनइतकीच असून लांबी २०० मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला २०० मीटरचा रस्ता असेल. हा पूल तीनपदरी करण्यात आला आहे.
मात्र या पर्यायी पुलाला सांगलीवाडीतील नागरिक व हरभट रस्त्यावरील व्यापाºयांनी विरोध केला आहे. व्यापाºयांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनही दिले आहे. सांगलीवाडीतून भाजपचे नेते, माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार विरोधाची तयारी सुरू झाली आहे. मध्यंतरी ठेकेदाराने पुलाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न सांगलीवाडीतील नागरिकांनी हाणून पाडला होता. त्यानंतर पुलाचे काम थांबले. वाढता विरोध पाहून ठेकेदारानेही काम सुरू करण्याचे धाडस केले नाही. त्यानंतर तीन ते चार महिने पुलाबाबत कसलीच वाच्यता झाली नाही. आता ठेकेदाराने यंत्रसामग्री सांगलीत आणली असली तरी, प्रत्यक्षात कामाला हात घातलेला नाही. त्यात सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कडाडून विरोध : दिनकर पाटील
आयर्विनच्या पर्यायी पुलाला नागरिक व व्यापाऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध अजूनही कायम आहे. आम्ही नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तयार करीत आहोत. लवकरच नव्या सरकारला व पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. नव्या पुलामुळे शहरातून अवजड वाहतूक सुरू होईल. आताच हरभट रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यात अवजड वाहतूक सुरू झाल्यास वाहतुकीचे नियोजनच कोलमडणार आहे. पर्यायी पूल उभा करायचाच असेल, तर तो हरिपूर रस्ता लिंगायत स्मशानभूमीजवळून करावा. त्यामुळे कोल्हापूर, मिरज ते इस्लामपूर या मार्गावरील वाहतूक शहराबाहेरून होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही. त्यातूनही पुलाचे काम सुरू झाल्यास आम्ही कडाडून विरोध करू, असे माजी आमदार दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.
पाटबंधारे विभागाकडे आराखडा सादर : हरिपूर-कोथळी पुलाला पाटबंधारे विभागाची तांत्रिक मान्यता घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने चालढकल केली. पण आयर्विनच्या पर्यायी पुलाबाबत मात्र बांधकाम विभागाने सावध पवित्रा घेतला आहे. पुलाचा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे. वास्तविक पर्यायी पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम दोन वर्षे सुरू होते. पुराचा धोका व इतर बाबींची तपासणी करूनच बांधकाम विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पर्यायी पुलाला हिरवा कंदील मिळेल, असा विश्वास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.