लोकमत न्यूज नेटवर्क
आळसंद : सोशल मीडियाच्या अतिवापराने समाज आत्मकेंद्रित व एकलकोंडा बनत चालला आहे. हे मळभ दूर करण्यासाठी विविधांगी वाचन चळवळ समाजात रुजविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाई संपतराव पवार यांनी केले.
बलवडी (ता. खानापूर) येथे वाचन चळवळीच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सोशल मीडियात हरविलेला तरुण पुस्तक वाचनाकडे पुन्हा वळावा यासाठी वाचन चळवळीचा उपक्रम येथे सुरू झाला. क्रांतिवीर उमाजी नाईक ब्रिगेडचे कार्यकर्ते व एसटी कर्मचारी महेश मदने यांनी तो सुरू केला आहे.
क्रांती स्मृतिवनात पवार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे उपस्थित होते. पवार यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून समकालीन प्रकाशनाची १२ पुस्तके भेट दिली. ते म्हणाले, वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याची नितांत गरज आहे.
शिरतोडे म्हणाले, असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला हवेत. उपक्रमाला अभिनंदन पाटील, योगेश कुंभार, शिवानंद धुमाळ, आदींनी पुस्तके भेट दिली. एसटी कामगार नेते अशोक शिरोटे, एसटी बँकेचे संचालक रावसाहेब माणकापुरे, नारायण सूर्यवंशी, ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, सरचिटणीस हिम्मतराव मलमे, उपाध्यक्ष सुनील दलवाई, सागर पाटील, हेमंत सुतार, प्रवीण तुपे, राजेश पाटील, विजय लोंढे, शैलेश मोरे, आदींनी शुभेच्छा दिल्या.