सांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथील सोनाली कदम आणि अभिराज कदम या दोघा निराधारांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही चालू आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना महिन्याला संगोपन भत्ता आणि नोकरी, शिक्षणात एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठीचा अनाथ प्रमाणपत्राचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसांत वडील अंकुश यांचेही निधन झाले.
जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवत पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. या मुलांवर वैद्यकीय उपचार होण्याची गरज असून, त्यांचे शिक्षणही चालू राहिले पाहिजे. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे मदतीची याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी होऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सांगली जिल्हाधिकारी यांना मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तातडीने मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एच. बेंद्रे यांनी बालसंगोपन योजनेंतर्गत या अनाथ बालकांना त्यांचे शिक्षण व संगोपन याकरिता दरमहा ११०० रुपये प्रती मुलास मिळणार आहेत. दोन्ही बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये १ टक्के आरक्षणाचा लाभ देणार आहे. यासाठी बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणार आहे, असेही बेंद्रे यांनी सांगितले.वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी ठोस मदतीची गरजसोनाली आणि अभिराज या दोघा निराधारांना शासकीय मदत मिळणार आहे; पण ती मदत तुटपुंजी असल्यामुळे त्यांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण, संगोपनासाठी मोठा खर्च येणार आहे. यासाठी ठोस मदतीची गरज असून, दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी केले आहे.