गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे आषाढ महिन्याच्या पूर्वसंध्येला पावसाच्या सरी झेलत चला गाव घडवू या, चळवळीच्या ''साद माणुसकीची'' संस्थेच्या ३५ कार्यकर्त्यांनी संतोषगिरी डोंगरावर बीजारोपण केले. तरुणांपासून सेवानिवृत्तांचा मोठा सहभाग होता.
विनोद मोहित्यांची यांनी बीजारोपणांची संकल्पना मांडली. संतोषगिरी डोंगर गोटखिंडी, बावची, नागाव, पोखरणी, भडकंबे या गावांच्या उश्याला विसावला आहे. तो त्रिधारी डोंगर आहे. पडत्या पावसाला न जुमानता पांडुरंग व दत्ता माने, भीमराव मोरे, सचिन व बाजीराव माळी, धनंजय व प्रताप थोरात, कोंडीराम येवले यांनी गुळ भेंडी, चिंचेच्या बिया लावल्या आहेत. ज्येष्ठ सदस्य अर्जुन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश माळी, विलास व शहाजी पाटील, काशिनाथ नांगरे, अमित सावंत, अभियंता माणिक पाटील, डॉ. प्रकाश शेंडगे यांनी डोंगराचा पायथा ते माथा, असा वृक्ष लागवड प्रवास सुरू ठेवला. सरपंच विजय लोंढे, डॉ. बाजीराव लोंढे, सुभाष पाटील, दत्ता बोगाणे, अण्णासाहेब देसाई यांनी वयाची साठी ओलांडलेली असून, तेही वृक्ष लागवड अभियानात सक्रिय सहभागी आहेत.
माजी उपसरपंच धैर्यशिल थोरात म्हणाले, मी दर रविवारी येतो. माथ्यावरची हिरवाई फुलवण्यात आम्ही सहभागी झालो. विमानातून ढग बघणे निराळे आणि आपल्याला स्पर्श करीत जाणारे ढग आणि धुके पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. सारेच जण वय विसरले. दहा हातांनी उधळण करणारा निसर्ग, वरून दिसणारे आपले गाव पाहून निसर्गाचे गोडवे गाण्यात आले. निसर्गाच्या कुशीत साठीनंतर अधून-मधून रमायला पाहिजे, हा धडा मिळाला. चला गाव घडवू या, चळवळीने गोटखिंडी गावात विधायक मानसिकतेचे बीजारोपण करण्यात आले. आनंद कुठल्या दुकानात मिळत नाही. निसर्गाच्या सानिध्यात तो भरभरून असतो. कोसळत्या पावसात चिंचेच्या बिया, गुळभेंडी आणि सीडबॉलची लागवड करणाऱ्या चला गाव घडवूयाच्या सर्व टीमच्या विधायकतेचे कौतुक होत आहे.