सांगली : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परराज्यातही एसटी धाऊ लागली असून, सांगली ते हैदराबाद आणि शिराळा ते हैदराबाद या दोन सेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यांमध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अद्याप बंदी कायम आहे.
एसटी महामंडळाच्या सांगली, मिरज, जत आगारातून कर्नाटक राज्यात सर्वाधिक बस धावत असून, तेथून उत्पन्नही चांगले मिळत आहे. विजापूर, बेळगाव, अथणी या ठिकाणी सर्वाधिक बस सांगली, मिरज आगारातून जात आहेत. कर्नाटक सरकार आजही प्रत्येक प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय राज्यात प्रवेश देत नाही. अन्य राज्यातील बसना कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. यामुळेही कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंतच महाराष्ट्रातील एसटी जात आहेत. हैदराबादला मात्र सांगली, शिराळा आगारातून दोन बस रोज जात आहेत. या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. पणजी मार्गावर येत्या आठवड्यात बस सुरू होतील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चौकट
परराज्यात जाणाऱ्या बस
-सांगली ते हैदराबाद
-शिराळा ते हैदराबाद
कोट
कर्नाटक सरकारने आरटीपीसीआरची चाचणी सक्तीची केली आहे, तसेच बस सुरू करण्यासही परवानगी दिली नाही. यामुळे कर्नाटक सीमेपर्यंतच बस जात आहेत. गोवा राज्यातही बस जात नाहीत. सध्या हैदराबाद राज्यातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. येत्या आठवड्यात कर्नाटक, गोवा राज्यातील वाहतूकही सुरळीत सुरू होईल.
-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग, एसटी महामंडळ
चौकट
चालक-वाहकांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण
एसटी महामंडळाची राज्यातील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही चालक-वाहकांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. येत्या पंधरा दिवसांत उर्वरित चालक-वाहकांचेही लसीकरण पूर्ण होणार आहे. एकही कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची एसटी महामंडळाचे अधिकारी काळजी घेत आहेत, असेही विभाग नियंत्रक वाघाटे यांनी सांगितले.
चौकट
हैदराबाद गाड्या फुल्ल
सांगली ते हैदराबाद आणि शिराळा ते हैदराबाद या परराज्यातील बसला चांगली गर्दी आहे. दोन्ही बस चांगले उत्पन्न देत असल्यामुळे नियमित सुरू आहेत. प्रवाशांनाही चांगल्या सेवा दिली जात आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार जादा बसही सोडण्यात येणार आहेत, असेही एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.