सांगली : गाय व म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचे आदेश शासनाने दूध संस्थांना देऊनही पुन्हा दरात कपात करण्यात आली आहे. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दुधाची बाटली भेट दिली. याप्रश्नी तातडीने निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
सुभाष देशमुख यांची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन शेतकरी संघटनेने त्यांना निवेदन व दूध दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने गायीच्या दुधाला प्रती लिटर २ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे आदेश दूध संस्थांना दिले होते. त्यानंतर दूध उत्पादक शेतकºयांना कशीतरी महिनाभर दरवाढ देण्यात आली. त्यानंतर अचानक सहकारी व खासगी दूध संघ व संस्थांनी गाईच्या व म्हैशीच्या दुधाचे दर प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी कमी केले. याबाबत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. दर कमी करणाºया संघ व संस्थांवर कारवाई करण्यास भाग पाडले, मात्र त्यानंतर राज्यातील दूध संघ व संस्थांच्या दबावाला बळी पडून कारवाईला त्यांनी स्थगिती दिली.
दर कमी केल्यामुळे उत्पादकांचा तोटा वाढत आहे. दूध खरेदी दर कमी करताना याच संस्थांनी ग्राहकांना विक्री दरात कोणतीही कपात केली नाही. दूध उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत मध्यस्थांचे कमिशन मिळून एकूण ८ ते १० रुपये खर्च होतो. दूध खरेदी दर व सर्व खर्च मिळून एकूण २८ ते ३0 रुपये होतात, मात्र ग्राहकांना तेच दूध ४० ते ४५ रुपयांना विकले जाते. त्यामुळे दूध उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संजय कोले, सुनील फराटे, रावसाहेब दळवी, शीतल राजोबा, रामचंद्र कणसे, मोहन परमणे, अल्लाउद्दीन जमादार, वसंत भिसे, एकनाथ कापसे, आण्णा पाटील उपस्थित होते.२७ रूपये दर हवापशुपालनाचा एकूण खर्च विचारात घेता गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर कमीत कमी २७ रूपये दर मिळायलाच हवा, अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. याबाबत तातडीने कार्यवाही करून दूध संस्थांना आठ दिवसांत निर्णय घेण्यास भाग पाडावे, अन्यथा शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने देशमुख यांना दिला.गाईच्या दूध दराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सांगलीत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सुभाष देशमुख यांना दुधाची बाटली भेट दिली.