शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:19 PM2017-12-17T23:19:49+5:302017-12-17T23:22:07+5:30

Statewide agitation for farmers' pension | शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

googlenewsNext


सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील होते. यावेळी राज्य सरचिटणीस शिवाजीराव परुळेकर, हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, बाळासाहेब कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.
शरद पाटील म्हणाले की, शेतकºयांची ताकद एकवटली तर मुख्यमंत्री, शासनालाही पळ काढावा लागेल. त्यांना पेन्शन दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज वयोवृद्ध शेतकºयांची अवस्था बिकट आहे. मुले, सुना सांभाळत नाहीत. माणसांची पांजरपोळ असलेली वृद्धाश्रमे वाढली आहेत. १९९२ मध्ये आर. आर. पाटील यांनी विधिमंडळात शेतकºयांच्या पेन्शनवर चर्चा घडवून आणली. तसा ठरावही झाला. पण २५ वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पेन्शनसाठी राज्यव्यापी लढा उभारून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू. दीड वर्षानी लोकसभेच्या निवडणुका आहेत. आमदार, खासदार मते मागायला येतील. तेव्हा पेन्शन द्या, मगच मतदान करू, अशी भूमिका घ्यावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन जनमत तयार केले जात आहे. त्यातून शासनाला शेवटचा टोला लगावू, असा इशाराही दिला.
शिवाजीराव परुळेकर म्हणाले की, नरेंद्र मोदींचे सरकार व्यापारी, उद्योजकांचे आहे. भाजपच्या पक्षनिधीसाठी दहा दिवसांत ८० हजार कोटी रुपये जमा केले. शेतकºयांना दोन हजार पेन्शन देण्यास भाजपची काय हरकत आहे. आधी वीज बिलात ३० टक्के वाढ केली; मग कृषी संजीवनी योजना लागू करून शेतकºयांचेच खिसे कापण्याचा उद्योग शासनाने केला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी मोठा लढा उभा करावा लागेल.
बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले की, आधी पेन्शन, मग मतदान, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून शेतकºयांनी एकजूट व्हावे, असे आवाहन केली, तर के. डी. शिंदें यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जयपाल चौगुले, बी. डी. पाटील, गोपाळ पाटील, बी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली.
यावेळी माजी नगरसेवक मोहन जाधव, विठ्ठल खोत, संजय ऐनापुरे, आबा सागर, डॉ. लक्ष्मण शिंदे, मुनाफ पटेल, प्रमोद ढेरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी हरिभाऊ दशवंत, शशिकांत गायकवाड उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनार्दन गोंधळी यांनी, तर आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.

भाजपचे शासन निगरगट
प्रा. शरद पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपचे शासन निगरगट आहे. शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ, शेतमजूर अशा गोंडस नावाखाली काही योजना सुरू केल्या; पण त्याला इतक्या जाचक अटी लावल्या की, लाभार्थी शोधूनही सापडणार नाही. क्रिमिलेअरचे उत्पन्न ८ लाखांपर्यंत वाढविले. आठ लाख उत्पन्न असलेल्यांना सवलती मिळणार, मग ५० हजार उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलत देण्यास शासनाचा हात आखडता का? असा सवालही त्यांनी केला.
दोन शरद खवळले!
राज्यातील दोन शरद खवळले आहेत. एक शरद पवार. तब्बल तीस वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. नागपूर येथे ते मोर्चात गेले. त्यांनी शासनाची देणी देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे. दुसरे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील. ते सर्वसामान्य शेतकºयांच्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेऊ नका, असे आवाहन शिवाजीराव परुळेकर यांनी केले.

Web Title: Statewide agitation for farmers' pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.