लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या उपचारांदरम्यान स्टेरॉइडचा वापर वाढला आहे. त्यामुळे कोरोनापश्चात रुग्णांना मूत्रपिंडाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय क्षेत्राने स्टेरॉइडसचा वापर तारतम्याने करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोना विषाणूबाबत नेमक्या औषध योजनेविषयी वैद्यकीय क्षेत्र आणि तज्ज्ञ मंडळी अजूनही संभ्रमात आहेत. प्लाझ्माचा वापर, रेमडेसिविर इंजेक्शन आदी औषधे उपयुक्त नसल्याचे आयसीएमआरने जाहीर केले, त्यानंतर आता स्टेरॉइडसचा वापर सुरू झाला आहे. हे औषध अनेकविध विकारांसाठी वैद्यकीय क्षेत्रात लोकप्रिय आहे. सहज आणि मुबलक उपलब्धता, कमी किंमत, कोणत्याही तत्काळ साइड इफेक्टची भीती नाही आदी कारणांनी त्याचा सर्रास वापर होतो. कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसत असले तरी आजारापासून लगेच मुक्तता मिळत असल्याने रुग्णही वापरासाठी आग्रह धरतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
स्टेरॉइडची हीच लोकप्रियता कोरोनामध्ये कामी आली आहे. फप्फुस सक्षम होण्यासाठी अनेक कोरोनाग्रस्तांना स्टेरॉइड दिले जात आहे. त्याचे परिणामही चांगले दिसत आहेत. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना मूत्रपिंडाचे विविध त्रास सुरू झाल्याचे आढळले आहे. सर्वच औषधांमधील टाकाऊ घटक मूत्रपिंडातून बाहेर पडतात. स्टेरॉइडदेखील याचमार्गे बाहेर पडत असल्याने मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे.
ग्राफ
कोरोनाचे एकूण रुग्ण १,३१, २७४
बरे झालेले रुग्ण १,१८,४७७
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ९,०४०
एकूण मृत्यू ३,७५७
दुसऱ्या लाटेतील मृत्यू १,९५७
बॉक्स
मूत्रपिंडाचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
- मूत्रपिंडाचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास तारतम्याने औषध योजना करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
- स्टेरॉइड वापरताना त्याचे प्रमाण सर्वसामान्य रुग्णांपेक्षी कमी आहे याचीही खबरदारी घेतली पाहिजे.
- मूत्रपिंड कर्करोगबाधित असल्यास स्टेरॉइडचे डोस कमी-जास्त करावे लागतात. औषधे मिश्रण स्वरूपात वापरतानाही परिणामांचा विचार करावा लागतो.
- कोरोनाग्रस्तावर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याच्या मूत्रपिंड विकारांविषयी माहिती घेणे ही डॉक्टारांसाठी प्राधान्याची बाब ठरते.
बॉक्स
हे करा...
- मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांनी दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवे, जेणेकरून मूत्राद्वारे औषधातील रसायनांचा निचरा होईल.
- कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांना मूत्रपिंडाच्या विकाराची माहिती द्या.
- डायलेसिस सुरू असल्यास त्याचीही माहिती द्या, सुरू असणाऱ्या औषधांविषयी सांगा.
हे करू नका...
- कोरोनातून बाहेर पडल्यानंतर मूत्रपिंडाच्या विकाराची अैाषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
- लघवी कमी होणे, रक्तदाब कमी जास्त होणे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
- कोरोनामध्ये बरेच दिवस व्हेटिंलेटरवर राहिल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो, त्याकडे कानाडोळा नको.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या स्टेरॉइड
- स्टेरॉइडमुळे मधुमेह होऊ शकतो, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापर करायला हवा.
- मधुमेहींमध्ये स्टेरॉइड वापराने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो, याचेही भान हवे.
- बळावलेला मधुमेह दृष्टीवरही हल्ला करतो, त्यामुळे स्टेरॉइडचे दुष्परिणाम गंभीर होऊ शकतात.
- रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार याचा त्रास असल्यास डॉक्टरांना कल्पना देऊन स्टेरॉइडकडे वळा.
कोट
कोरोनाग्रस्तांवर स्टेरॉइडचा वापर जपूनच....
कोरोनाग्रस्तांवर स्टेरॉइडच्या वापराने मधुमेह बळावण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रतिकारक्षमता खालावते. रुग्ण बरेच दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्याने रक्तदाब कमी होतो, त्याचाही परिणाम मूत्रपिंडावर होतो. या स्थितीत स्टेरॉइडचा वापर अत्यंत विचारपूर्वक करायला हवा. त्यातील सर्व रसायने लिव्हर व मूत्रपिंडाद्वारेच बाहरे पडत असल्याने स्टेरॉइड जपूनच वपरले पाहिजे.
- डॉ. मकरंद खोचीकर, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ, सांगली