जिल्ह्यातील रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:39+5:302021-04-13T04:24:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. कोरोना हॉस्पिटल ही उपचाराची केंद्रे व्हावीत, रुग्णांची लूट करणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. कोरोना हॉस्पिटल ही उपचाराची केंद्रे व्हावीत, रुग्णांची लूट करणारी केंद्रे होऊ नयेत, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, यापूर्वी शहरी भागात संसर्ग प्रमाण अधिक होते आणि ग्रामीण भागात कमी होते. आता तसे राहिलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा सुविधा वाढविण्यावर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचाराचा खर्च कमी होण्यासाठी सरकारने हॉस्पिटल्सना पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज उपलब्ध करून द्यावेत. आधीच आर्थिकदृष्ट्या खचलेल्या समाजाला कोरोना उपचाराचे खर्च परवडणारे नाहीत. लाखोंचा उपचार करण्यापेक्षा मृत्यू चांगला असे रुग्णाला वाटू नये यासाठी सरकारने गांभीर्याने खर्च कमी होण्याचा प्रयत्न करावा.
मंदिरांबाहेरचे फुलवाले, केश कर्तनालय अशा घटकांचा विचार राज्य सरकारला करावाच लागेल. संपूर्ण नुकसान भरपाई सरकार देऊ शकत नसले तरी किमान ते जगू शकतील, हा तरी विचार राज्य सरकारने करावा. व्यापारी, छोटे व्यावसायिक, रिटेलर्स, फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रते, पान असोसिएशन आदींच्या अडचणीही ऐकून निर्णय घ्यावा. सततच्या आर्थिक संकटाने ते आता खचले आहेत. त्यांच्या समस्यांचा, विविध घटकांच्या आर्थिक संकटाचा विचार शासनाने करावा.
चौकट
महालॅबबाबत निर्णय घ्या
सांगली आणि मिरज सिव्हिल महालॅबशी जोडलेले नसल्याने या दोन्ही रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या चाचण्या मोफत होऊ शकत नाहीत. हा निर्णय बदलून सांगली आणि मिरज सिव्हिलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या चाचण्याही मोफत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी गाडगीळ यांनी केली.