शिराळा : मार्चअखेर असल्याने बँका व पतसंस्थांनी महिलांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. ही कर्जवसुली थांबवून कोरोनाच्या काळात आलेली वाढीव वीजबिले कमी करावीत अथवा माफ करावीत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विद्या पाटील यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला आहे. अजूनही या व्यवसायातून महिला सावरू शकलेल्या नाहीत. छोटे - मोठे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी महिलांनी पतसंस्था व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सध्या पतसंस्था, बँकांनी तगादा लावला आहे. व्यवसायच नाही तर कर्ज कशी फेडायची हा प्रश्न महिलांना पडला आहे. त्यामुळे बँका व पतसंस्थांनी वसुली थांबवावी. तसेच कोरोना काळात घटगुती वीजबिल वाढून आली आहेत. ती बिले कमी करावीत अथवा माफ करावीत. अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी डॉ.जयश्री पाटील, संजीवनी पाटील, लता पाटील, शुभांगी पाटील, माधुरी पाटील, आशा जाधव, वनीता जाधव, सावित्री गाडे, सुनीता कांबळे, अश्विनी कांबळे आदी उपस्थित होत्या.