जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:10+5:302021-06-26T04:20:10+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालल्याने सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालल्याने सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा जादा असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे आदेश दिले.
बाजारपेठेत वाढतच चाललेली गर्दी आणि काेरोना स्थिती नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हा तिसऱ्या स्तरातून चौथ्या स्तरात गेला आहे. पंधरवड्यापासून पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. या आठवड्यातही १० टक्क्यांपेक्षा जादा रेटची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौथ्या स्तरातील निर्बंध लागू केले असून सोमवार, दि. २८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
किराणा, औषध दुकाने, भाजीपाला, दूध विक्रीसह अत्यावश्यक सेवेतील दुकानांना चारपर्यंत परवानगी कायम असणार आहे. बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेसह सेवा देण्यावर आता बंदी असणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सुरू असणार आहे. सार्वजनिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. सोमवारपासून ५ जुलैपर्यंत या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
चौकट
लग्नासाठी आता २५ व्यक्ती
लग्नासाठी असलेली ५० व्यक्तींची क्षमताही कमी झाली असून आता २५ लोकांच्याच उपस्थितीत विवाह समारंभ केवळ दोन तासांच्या अवधीत पूर्ण करावा लागणार आहे. या निर्बंधांचा भंग केल्यास ५० हजारांचा दंड करण्यात येणार आहे, तर नियमभंग करणारे मंगल कार्यालय सील करण्यात येणार आहे.
चौकट
या सेवा बंद राहणार...
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सभागृहे, हॉटेल्स, बीअरबार, हातगाडी, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडा बाजार
चौकट
या सेवा सुरू राहणार...
किराणा, औषध दुकाने, भाजीपाला, फळे विक्रेते, दूध व दुग्ध पदार्थ विक्री, बेकरी, मिठाई, इतर खाद्य दुकाने, हॉटेलमधील पार्सल सेवा, हातगाडीवरील पार्सल सेवा, बाजार समिती, फळ मार्केटमधील व्यवहार, दूध संकलन, भाजी मंडई