इस्लामपूर येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयात कायदेविषयक शिबिरात न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. साळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, अजिंक्य कुंभार, अॅड. रूपाली खोत, अॅड. ए. डी. माळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्त्रियांच्या हिताचे अनेक कायदे असून त्यातील तरतुदी माहीत नसल्याने अनेक पिढ्या त्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थिनींनी स्वत:बरोबरच समाजहितासाठी महिलाविषयक कायद्याचे ज्ञान विद्यार्थिनींनी प्राप्त केले पाहिजे, असे प्रतिपादन इस्लामपूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. व्ही. साळवी यांनी केले.
येथील श्रीमती कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालयात वाळवा तालुका विधिसेवा समिती, वकील संघटना व पंचायत समिती इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समिती यांच्या सहकार्याने महिला दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिरात त्या बोलत होत्या. कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. रूपाली खोत यांनी ‘मनोधैर्य योजना पीडितेचे नुकसान भरपाई योजना’ याबद्दल माहिती दिली. या अंतर्गत ५० हजार ते ३ लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळते, तसेच सोशल मीडियाचा वापर मर्यादित करून विद्यार्थिनींनी सतत जागरूक असले पाहिजे असे स्पष्ट केले.
अॅड. मनीषा वनमोरे यांनी ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायदा’ याविषयी माहिती दिली. अॅड. ए. डी. माळी यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शैलजा टिळे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले.