मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथील उपसरपंच धोंडीराम देसाई यांना दोनपेक्षा जादा अपत्ये असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवले आहे.
गुंडेवाडी येथील संतोष ऊर्फ धोंडीराम देसाई हे अपक्ष निवडणूक लढवून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले होते. देसाई यांना उपसरपंच निवडीत समान मते मिळाली. सरपंचांनी निर्णायक मत दिल्याने देसाई यांची उपसरपंचपदी निवड झाली. याबाबत अण्णासाहेब मोटे व चंदर कटारे यांनी देसाई यांना दोनपेक्षा जादा अपत्ये असल्याचा पुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. चाैकशीत देसाई यांना दोनपेक्षा जादा अपत्ये असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून देसाई यांना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यपद रिक्त असल्याचे जाहीर केले. एक महिन्यापूर्वीच देसाई यांना उपसरपंचपद मिळाले होते. उपसरपंचपद व सदस्य म्हणून ते अपात्र ठरल्याने गावात खळबळ उडाली आहे.