स्पर्धा परीक्षेतील यशस्वितांनी तरुणांना आत्मविश्वास द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:51 AM2021-02-21T04:51:44+5:302021-02-21T04:51:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : स्पर्धा परीक्षेतून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी व अधिकाऱ्यांनी समाजातील इतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : स्पर्धा परीक्षेतून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी व अधिकाऱ्यांनी समाजातील इतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १५२व्या रँकने असिस्टंट कमांडट पदावर नियुक्ती झालेल्या मांगले (ता. शिराळा) येथील तुषार गावडे यांचा शिराळा तालुका धनगर समाज व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, धनगर महासंघाचे अध्यक्ष चिमण डांगे, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यावेळी उपस्थित होते.
कृष्णात पिंगळे म्हणाले, आयुष्यात येणारी संकटेच आपल्यातील जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाची परीक्षा घेत असतात. तेच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतात.
चिमण डांगे म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तुषार गावडे याने देशस्तरावरील परीक्षेतील मिळविलेले यश हे इतर तरुणांना प्रेरणादायी आहे.
तुषार गावडे म्हणाले, समाजातील इतर तरुण पुढे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळाल्यास माझ्यासारखे अनेक तरुण पुढे येतील.
यावेळी शंकरराव चरापले, जयसिंगराव पाटील, सांगली मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक अजित शिद, शिराळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सरपंच मीनाताई बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे उपस्थित होते. विजय पाटील यांनी आभार मानले.