युनूस शेख ।इस्लामपूर : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ७६ वर्षीय निवृत्त शिक्षकाने उत्तम व्यवस्थापन आणि शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६० गुंठे क्षेत्रात १९२ टन उसाचे उत्पादन घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यांना एकरी १२८ टनाचा सर्वोच्च उतारा मिळाला. त्यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी बियाणांची लागण केली होती. प्रत्येक ऊस हा २२ ते २५ कांड्यांचा होता.
बळवंत दत्तू गायकवाड असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. निवृत्त होऊन त्यांना १६ वर्षांचा कालावधी झाला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी कष्टाच्या जोरावर ही यशोगाथा निर्माण केली आहे.शेताची पूर्वमशागत करतानाच गायकवाड यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला. राजाराम बायोअर्थ, शेणखत, समृद्ध खताने ही मशागत करून सरी सोडल्या. ऊस बेण्यावर सिटो जिवाणूंचा बेसल डोस दिल्यावर लागण केली. लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली.
उसाच्या वाढीनुसार खत मात्रेत वाढ करताना, प्रत्येक आठवड्यास संजीवके, कीटकनाशक, विद्राव्य खते ही ठिबक सिंचन संचातून दिली. भरणीवेळी एनपीके खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीच्या कसानुसार दिली. ऊस वाढीसाठी राजाराम नायट्रो प्लस, फॉस्फो प्लस, केएसबी, मेटारायझियम अशा जिवाणू खतांचा वापर प्राधान्याने केला.निवृत्तीनंतर गायकवाड यांंनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मिळालेले यश हे तरूण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. अन्य शेतकºयांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
या यशाबद्दल राजारामबापू कारखान्याचे मार्गदर्शक, अर्थमंत्री जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
- ठिबकद्वारे जिवाणू
प्रत्येक ३ महिन्याने ठिबकद्वारे जिवाणू सोडण्याचे नियोजन १० महिन्यांपर्यंत केले. उसाचा पाला काढणे, तणनाशक फवारणी केल्याने वाढीला मदत झाली. ६ डिसेंबरला या उसाची तोडणी झाल्यावर बळवंत गायकवाड यांच्या कष्टाला हे यश मिळाले. योग्य नियोजनातून शेती व्यवसायात यश मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
- माती परीक्षण
ऐतवडे बुद्रुक येथील आपल्या ६० गुंठे शेतीमध्ये जून २०१८ मध्ये ऊस बियाणांची लागण केली. त्यापूर्वी मातीचा पोत माती परीक्षणातून माहिती करून घेतला. त्यानुसार ठिबक सिंचनाचे पाणी, जैविके खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांची मात्रा ठरवली. या प्रयोगात त्यांना राजारामबापू कारखान्याचे व्यवस्थापन आणि शेती विभागाची मोठी मदत मिळाली.
ऐतवडे बुदुक (ता. वाळवा) येथील बळवंत गायकवाड यांनी मोठ्या कष्टातून ६० गुंठे क्षेत्रात उसाचे १९२ टन उत्पादन घेऊन यशस्वी शेती केली आहे.