सुहास बाबर यांचा ‘एक मुक्काम गावकºयांसोबत!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:42 AM2017-12-13T00:42:41+5:302017-12-13T00:45:43+5:30
विटा : पाच वर्षातून एकदा केवळ मते मागण्यापुरते गावात न जाता, त्या-त्या गावातच मुक्काम करून त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी
विटा : पाच वर्षातून एकदा केवळ मते मागण्यापुरते गावात न जाता, त्या-त्या गावातच मुक्काम करून त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी खानापूर तालुक्यात ‘एक मुक्काम गावकºयांसोबत’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याची सुरूवात रेणावी येथून करण्यात आली. उपाध्यक्ष बाबर दर पंधरा दिवसांनी तालुक्यातील एक गाव निवडून तेथे रात्रीचा मुक्काम करणार असून समस्या सोडविण्याचे काम करणार आहेत.
प्रत्येक खेडेगावातील लोकांना समस्या मांडण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येता येईलच असे नाही. त्यासाठी सर्वसामान्यांनी आपल्याकडे येण्याऐवजी आपणच त्यांच्या गावात एक रात्र मुक्काम करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर त्याची वास्तवता समजून येईल, या उद्देशाने बाबर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत बाबर यांनी रेणावी येथे पहिला मुक्काम केला. यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेची पाहणी करीत शाळांचा परिसर, दर्जा, उपलब्ध सुविधा, गुणात्मक परिस्थिती यासह विविध ग्रामस्थांचे विविध प्रश्न समजावून घेतले. या बैठकीला गट-तट विसरून सर्व रेणावीकर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बससेवा, अंगणवाडी, दलित वस्ती, समाजमंदिर, रेशन धान्य याबाबतचे विविध प्रश्न मांडले. त्यानंतर बाबर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते, गटारी, दिवाबत्ती, घरकुल, नाईक समाजाचे समाजमंदिर, मुस्लिम दफनभूमी आदी कामांची पाहणी करून ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान आणि नांदेड पॅटर्न शोषखड्डे याबाबत आग्रही राहण्याच्या सूचना केल्या.
बाबर यांनी रेणावी गावात मुक्काम करून दुसºयादिवशी सकाळी ते बसस्थानकावर आले. यावेळी विटा येथे शाळेला येण्यासाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. या वेळेत दोन एसटी बसेस गेल्या. पण त्या थांबल्या नाहीत. त्यामुळे बाबर यांनी तातडीने विटा आगाराशी संपर्क साधून, बस थांबविण्याच्या सूचना दिल्या.
विलक्षण व सुखद अनुभव...
अनेकदा सामान्य जनता आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने गावातील प्रश्नांची वास्तवता समजत नाही. त्यामुळे आपणच स्वत: गावात जाऊन प्रत्येकांशी संवाद साधावा, या उद्देशाने ‘एक मुक्काम गावकºयांसोबत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. हा अनुभव विलक्षण व सुखद आहे. जनतेचे प्रश्न व समस्या समजून घेता आल्या. जनतेचे प्रश्न व समस्यांचा निपटारा करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी यावेळी व्यक्त केले.