- संतोष भिसे
जोरदार पावसासाठी कधी-कधी देशात विक्रम नोंदविणाऱ्या पाथरपुंजने सांगली, कोल्हापूर, साताऱ्याला दिलेली भेट म्हणजे वारणा नदी होय. सह्याद्री पर्वतराजीत प्रचितगडावर जन्मते, तेथून लाखो भूमिपुत्रांचे भरणपोषण करत हरिपूर येथे संगमेश्वराच्या पिछाडीला कृष्णेत सामावते. स्वत: वारणा कृष्णेची उपनदी आहे; तर कडवी, मोरणा, शाली, अंबार्डी या वारणेच्या उपनद्या आहेत.
कोकण व दख्खन पठारांदरम्यान वारणा वाहत असल्याने दोहोंची स्वभावसंगती वारणेत प्रतित होते. देशातील पहिले मातीचे धरण चांदोलीवर बांधले गेले हे आणखी एक वैशिष्ठ्य. वारणाकाठी वसलेले वारणानगर हे नदीमुळे झालेल्या चौफेर विकासाचे जिवंत उदाहरण.
नदीचा लोकमानसातील सहभाग इतका जिवंत की, त्यावर ‘वारणेचा वाघ’सारखे सिनेमे निघाले आणि हिटदेखील झाले. इतिहासतज्ज्ञांच्या मते वारणेचा पहिला उल्लेख इ.स. ११५४ मध्ये आढळतो, म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याही अगोदर. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील एका ताम्रपटात ‘वारवेण्णा’ असा तिचा नामोल्लेख आहे. कालांतराने ती वारणा झाली. सध्या वाकुर्डे कालव्यामुळे सातत्याने राजकीय, सामाजिक संघर्ष होत असतो. वारणेला त्याची जणू सवयच आहे. १७३१ मध्ये सातारा व करवीर गाद्यांमध्ये सीमांवरून वाद पेटला, तह करून तो मिटविला. एका तीरावरची गावे करवीर गादीकडे तर दुसरी साताऱ्याकडे राहिली. नदीवरून झालेला कदाचित हा पहिलाच तह असावा.
चौकट
वारणा जेव्हा उफराटी वाहते...
कृष्णा-वारणेने गेल्या दोन-तीन महापुरात भरविलेली धडकी सांगली-कोल्हापूरकर अजूनही विसरलेले नाहीत. असाच प्रसंग पेशवेकाळातही निर्माण झाला होता. कृष्णेच्या अकराळ-विकराळ महापुराचे पाणी संगमावर वारणेत शिरले, दाबामुळे वारणा उलटी वाहिली. अखेर तिची शांती करावी लागल्याची नोंद आहे.