जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराचा ‘सुपर संडे’!
By Admin | Published: October 12, 2014 11:11 PM2014-10-12T23:11:39+5:302014-10-12T23:33:02+5:30
विधानसभा निवडणूक : प्रचार सभा, पदयात्रा, गाठीभेटी, बैठकांनी वातावरण तापले
सांगली : प्रचार सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा, लाऊडस्पिकरवरील प्रचाराचा मारा... अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हाभर आज प्रचाराचा ‘सुपर संडे’ उमेदवारांनी आणि नागरिकांनी अनुभवला. दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रचाराचा धडाका सुरू होता. रिंगणातील शेकडो उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून आज प्रचार केला.
सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सध्या काट्याची लढत होत आहे. चौरंगी आणि पंचरंगी लढतींमुळे प्रचाराचा धडाकाही यंदा वाढला आहे. रविवारी शासकीय सुट्टीमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची शेवटची नामी संधी उमेदवारांना मिळाल्याने, आज उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दिवसभर अविश्रांत राबत होते. दिग्गज नेते, माजी मंत्री आणि नवोदित उमेदवारांनीही प्रचारात ताकद लावली आहे. जिल्ह्यातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांनी गुरुद्वाराला भेट दिली. त्यानंतर डॉक्टर, रिक्षाचालक यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. जुनी धामणी, अंकली, हरिपूर आणि संजयनगर येथेही त्यांचे प्रचार कार्यक्रम पार पडले. भाजपचे सुधीर गाडगीळ यांनीही सांगली शहरात रॅली व प्रचार सभा घेतल्या. सांगलीवाडी, नांद्रे, बुधगाव याठिकाणीही त्यांच्या प्रचार सभा झाल्या. इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत पाटील यांनी आज सावळवाडी, माळवाडी, मौजे डिग्रज येथे बैठका घेतल्या. शिराळा, मिरज, आष्टा आणि इस्लामपूर येथे त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. विरोधी अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांनी इस्लामपूर शहरात प्रचार केला. बावची येथे सभाही घेतली. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी कुची, शिरढोण, अलकूड, देशिंग, खरशिंग, सावळज आणि मणेराजुरी येथे प्रचार सभा व बैठका घेतल्या. प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी तुरची, येळावी, मणेराजुरी, चिंचणी, कुमठा, सावळज येथे प्रचार सभा घेतल्या. वायफळे, यमगरवाडी येथे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.
मिरज मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी मिरज शहरातील चार प्रभागात पदयात्रा काढल्या. अपक्ष उमेदवार सी. आर. सांगलीकर यांनी बेडग, सोनी येथे पदयात्रा काढल्या, तर कवलापूर येथे जाहीर सभा घेतली. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी तालुक्यातील शेणी, तांबवे, येलूर, चिकुर्डे येथे प्रचार सभा घेतल्या. शिराळा येथे खासदार सुप्रिय्
ाा सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. शिवाजीराव नाईक यांनी डोंगरवाडी, करंजवडे, मालेवाडी, विठ्ठलवाडी, पेठ, तांबवे, कासेगाव येथे सभा घेतल्या. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आ. सदाशिवराव पाटील यांनी आळते, चिखलगोठण, निंबळक, लिंब येथे प्रचार सभा घेतल्या.
खानापूर आटपाडीत राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख यांनी माहुली, चिखलगोठण, खानापूर, मांजर्डे, पारे, बलवडी येथे प्रचारसभा घेतल्या. जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांनी औंढी, लोहगाव, अंत्राळ, वायफळे येथे, तर राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे यांनी सनमडी, खैराव, माडग्याळ, उमदी, सोन्याळ आणि जत येथे प्रचारसभा व पदयात्रा केल्या.
पलूस-कडेगाव येथे पतंगराव कदम यांनी आज रायगाव, बोंबाळेवाडी, कडेगाव, पलूस येथे प्रचार सभा घेतल्या. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे रॅली काढली. प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी नेवरी, खेराडेवांगी येथे सभा तर कडेगाव व चिंचणी येथे बैठका घेतल्या. (प्रतिनिधी)
स्टार प्रचारकांचीही हजेरी
प्रचार संपण्यास एकच दिवस राहिल्याने रविवारी प्रत्येक पक्षाच्या स्टार प्रचारकांनी जिल्ह्यात प्रचार कार्यक्रमांना हजेरी लावली. शिराळा येथे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. काँग्रेसचे स्टार प्रचारक पृथ्वीराज चव्हाण यांनी येलूर (ता. शिराळा) येथे सभा घेतली. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचार कार्यक्रमांना हजेरी लावली. रॅलीसह त्यांनी सभेतही प्रचार केला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेतली.