सांगली : पॉस यंत्रणेतील बिघाडामुळे जिल्ह्यातील रेशनवरील धान्याचा पुरवठा बंद झाला आहे. यामुळे संतापलेल्या रेशन दुकानदारांनी मंगळवारी कंपनीच्या प्रतिनिधीकडे २२० यंत्रे जमा करीत अन्नधान्य वितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. कंपनी प्रतिनिधीने दुरुस्तीबाबत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर दुकानदारांनी मशीन ताब्यात घेतल्या.सांगली शहर व ग्रामीण संघर्ष रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मंगळवारी उत्तर शिवाजीनगरमधील अन्नधान्य वितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. तांत्रिक अडचणींबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही दुरुस्ती न झाल्यामुळे सांगली शहर व ग्रामीण भागांतील २२० रास्तभाव धान्य दुकानदारांनी या यंत्राचा पुरवठा करणाऱ्या ‘व्हिजनटेक’ कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस बोलावून यंत्रे परत केली. याची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव उन्हाळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. येत्या पंधरा दिवसांत कंपनीचे इंजिनिअर प्रत्येक दुकानात भेट देऊन नेटवर्क तपासून योग्य नेटवर्कचे सिम कार्ड बसवून देतील, असे लेखी आश्वासन कंपनी प्रतिनिधीने पुरवठा अधिकाऱ्यांसमोर दिलेे. त्यानंतर यंत्रे परत करण्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व बिपिन कदम यांनी केले. यात शहर अध्यक्ष रमजान बागवान, नंदकुमार पांड्याजी, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब सदलगे, लक्ष्मी कांबळे, सुजाता ठोकळे, राजू पखाली, प्रफुल्ल ठोकळे, नगरसेवक संजय यमगर, सुनील आलदर, सुरेश यमगर आदी सहभागी झाले होते.
तर पुन्हा आंदोलन
येत्या १५ दिवसांत यंत्रांची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर पुन्हा आंदोलन करून यंत्रे परत देण्यात येतील, असा इशारा कदम यांनी यावेळी दिला.