सांगली : आदित्य डायग्नोस्टिकचा जैववैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी हा कचरा गोळा करणाऱ्यासाठी नियुक्त केलेल्या सूर्या एजन्सीला महापालिकेने २५ हजारांचा दंड केला. आयुक्त कापडणीस यांच्या आदेशानुसार आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी ही कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी आदित्य डायग्नोस्टिकमधील जैववैद्यकीय कचरा गणेशनगरमधील महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये टाकत असताना नागरिकांनी पकडला होता. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी संबंधित आदित्य डायग्नोस्टिकला १ लाखाचा दंड करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर ज्यांच्याकडे हे बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्याची जबाबदारी आहे, त्या सूर्या एजन्सीलासुद्धा महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यामुळे या प्रकरणात सूर्याकडून वेळेत कचरा उचलला गेला नसल्याने त्यांनाही दोषी ठरवत २५ हजारांचा दंड आरोग्याधिकारी डॉ. ताटे यांनी केला आहे. स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे यांनी हा दंड वसूल केला.