नागेवाडी कारखान्यासमोर ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:15+5:302021-04-17T04:26:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : गेल्या तीन महिन्यांपासून गाळप झालेल्या उसाचे बिल दिले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : गेल्या तीन महिन्यांपासून गाळप झालेल्या उसाचे बिल दिले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ऊस उत्पादकांनी शुक्रवारी नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्यांसमोर तीव्र आंदोलन केले. यावेळी खा. संजयकाका पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दि. ३० एप्रिलपर्यंत पैसे देण्याचे आश्वासन दिले.
खा. पाटील यांच्या खासगी कंपनीकडे असलेल्या नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्याने जानेवारीपासून तीन महिन्यांचे ऊस बिल दिलेले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी कारखान्यासमोर संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. ‘ऊस बिल आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे’ यासह विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
त्यावेळी खा. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
नागेवाडी व तासगाव साखर कारखान्यांना ज्या ऊस उत्पादकांनी गाळपासाठी ऊस दिला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे येत्या दि. ३० तारखेपर्यंत बॅँक खात्यांवर वर्ग करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी खा. पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात राजेंद्र माने, गोरख महाडीक, विनायक पवार, अख्तर संदे, नारायण महाडिक, सचिन महाडिक, भागवत जाधव, जोतीराम जाधव, अशोक खाडे, गुलाबराव यादव सहभागी झाले होते.
चौकट :
...अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन...
नागेवाडी व तासगाव साखर कारखान्यांना ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची बिले अद्याप दिलेली नाहीत. गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत बिल देणे बंधनकारक असताना दोन महिने उलटून गेले तरी मिळालेली नाहीत. दि. ३० एप्रिलपर्यंत ती न दिल्यास कारखान्यासमोर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.